पोलिसाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न प्रकृती गंभीर : प्रकरण दडपण्यासाठी ‘फिल्डिंग’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:03 IST2019-06-29T01:01:11+5:302019-06-29T01:03:59+5:30
सासरी आलेल्या आई-वडिलांवर चोरीचा आळ घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने निलंबित पोलीस हवालदाराच्या पत्नीने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न प्रकृती गंभीर : प्रकरण दडपण्यासाठी ‘फिल्डिंग’!
एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : सासरी आलेल्या आई-वडिलांवर चोरीचा आळ घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने निलंबित पोलीस हवालदाराच्या पत्नीने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
चार दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराने पोलीस दलात खळबळ उडाली असून, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी संबंधित हवालदाराने रुग्णालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत फिल्डिंग लावली असल्याची वर्दीमध्ये चर्चा आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका पोलीस ठाण्यात संबंधित हवालदार सेवेत होता. परिसरातील मटका व्यावसायिकाकडून हप्ता वसूल केल्याच्या आरोपाखाली त्याला काही महिन्यांपूर्वी निलंबित केले आहे. अवैध व्यावसायिकांशी सलगी वाढवून ‘खपल्या’ काढण्यात तो आघाडीवर असतो. त्याने नेमणुकीस असलेल्या पोलीस ठाण्यातीलच एका कॉन्स्टेबल युवतीशी प्रेमसंबंध जोडले. हा प्रकार घरी समजल्यानंतर त्याला कुटुंबाकडून विरोध होऊ लागल्याने तो युवतीशी टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक होत असल्याच्या संतापाने संबंधित कॉन्स्टेबल युवती थेट त्याच्या घरात घुसली. पत्नीसमोरच तिने त्याचे प्रेमाचे पितळ उघडे पाडले. ‘लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन,’ अशी धमकीच तिने दिली. या वादळामुळे संबंधित हवालदार भांबावून गेला.
काही दिवसांपूर्वी पत्नीचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांच्यावर त्याने चोरीचा आळ घेतला. हा धक्का पत्नीला सहन झाला नाही. यातून तिने घराच्या तिसºया मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या अंगाची हाडे मोडली असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
भीतीपोटी गोपनीयता
स्वत: अडचणीत येऊ, या भीतीपोटी हवालदाराने या घटनेबाबत गोपनीयता पाळली आहे. त्याचे काही मित्र रुग्णालयात जाऊन जखमी पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करून आले आहेत. पत्नी शेवटची घटका मोजत असतानाही त्याची मग्रुरी वाढत आहे. तो काहीच झाले नसल्याच्या अविर्भावात फिरत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतल्यास प्रामाणिक पोलीस पत्नीला न्याय मिळेल, अशी चर्चा पोलीस दलात आहे.