पोलिसांनी शिवरायांचा पुतळा हटवल्याने वाद, गावातील तरुण एकवटले; कोल्हापुरात तणाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 13:12 IST2023-11-22T13:10:35+5:302023-11-22T13:12:46+5:30
पोलिसांनी शिवरायांचा पुतळा हटवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हडलगे गावात वाद निर्माण झाला होता.

पोलिसांनी शिवरायांचा पुतळा हटवल्याने वाद, गावातील तरुण एकवटले; कोल्हापुरात तणाव!
कोल्हापूर : ग्रामस्थांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने हटवल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हडलगे गावात आज सकाळपासून तणाव निर्माण झाला. मात्र सदर पुतळा हा खासगी जागेत उभारण्यात आला होता. तसंच गावातील कोणीही पुतळा उभारल्याची जबाबदारी घेत नसल्याने आम्ही हा पुतळा काढून बाजूला ठेवल्याचं पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडलगे गावात उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवल्याचं आज सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आलं. त्यानंतर गावातील तरुण आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोलीस गावात दाखल झाले. पुतळा उभारण्यासाठी कसलीही परवानगी घेण्यात आली नाही. तुम्ही रीतसर परवानगी घ्या, त्यानंतर आपण पुन्हा हा पुतळा उभारू, असं आश्वासन पोलिसांनी गावकऱ्यांना दिलं. त्यानंतर हा वाद काहीसा निवळला आहे.
गावकऱ्यांनी जिथं शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारायचा आहे, त्या जागेबाबत परवानगी घेतल्यानंतर आधी चौथरा बांधून नंतर पुन्हा पुतळा उभारला जाईल. तोपर्यंत आम्ही हा पुतळा गावकऱ्यांकडे सुपूर्द करत आहोत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे कोल्हापुरात पुतळ्यावरून तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे अमरावतीतही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कारण अमरावतीत नुकतंच एका तरुणाने सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.