कोल्हापूर : भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील मंदिरे, पर्यटनस्थळे, धरणे आणि गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. देशविघातक कारवाया करणाऱ्या स्लीपर सेलवर सुरक्षा दलांची करडी नजर असून, बॉम्ब शोधक व नाशक पथक यासह गोपनीय माहिती काढणारे सर्व विभाग अलर्ट मोडवर असल्याची माहिती फुलारी यांनी दिली.पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यानंतर दोन्हीकडून हवाई हल्ले सुरू असल्याने देशातील पोलिस दल अलर्ट मोडवर आहे. दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांशी संबंधित काही स्लीपर सेल यापूर्वी राज्यात कार्यरत होते. गेल्या दोन-तीन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातून दोन दहशतवाद्यांसह अनेक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. युद्धजन्य स्थितीत असे स्लीपर सेल सक्रिय होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.केंद्र सरकारसह राज्यातील गोपनीय माहिती संकलित करणारे विभाग संशयित संघटना आणि व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. दैनंदिन घडामोडींची माहिती वरिष्ठ कार्यालयांना पाठवली जात आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांनी दिली.यंत्रणांची सज्जतापोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वानपथक, गोपनीय विभाग, शीघ्रकृती दले, वाहने सज्ज ठेवण्याच्या सूचना सर्व पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. नियमित मॉक ड्रिल, सराव केले जात आहे. सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती फुलारी यांनी दिली.
भारत-पाकमधील युद्धजन्य स्थितीत परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अफवा पसरवून लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवू नये. तसेच सोशल मीडियाचा विचारपूर्वक वापर करावा. -सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक