कोल्हापूर : कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या १७ वर्षीय मुलास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. १३) आरकेनगर येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४ हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. पिस्तूल देणारा मित्र ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे (वय २५, रा. मोरेवाडी, ता. करवीर) याला पोलिसांनी अटक केली.मोरेवाडी परिसरातील एक अल्पवयीन मुलगा कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार अमोल कोळेकर आणि सुरेश पाटील यांना मिळाली होती. तो मंगळवारी दुपारी आरकेनगर परिसरात येणार असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आरकेनगर येथील सोसायटी क्रमांक चारमधील हॉलसमोर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.अंगझडतीत त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. अधिक चौकशीत त्याने मित्र ऋतुराज भिलुगडे याच्याकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने भिलुगडे याला अटक केली. जप्त केलेले पिस्तूल मध्य प्रदेशातून खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पुढील तपासासाठी दोघांचा ताबा करवीर पोलिसांकडे देण्यात आला.भीती घालण्यासाठी पिस्तूलाचा वापरऋतुराज भिलुगडे हा मोरेवाडी, आरकेनगर परिसरात पिण्याच्या पाण्याचे जार पुरवण्याचे काम करतो. पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन मित्र त्याच्याकडे काम करतो. गावात एका व्यक्तीशी किरकोळ वाद झाल्याने त्याने भिलुगडे याच्याकडून पिस्तूल घेतले होते. भीती घालण्यासाठी तो पिस्तूल कमरेला लावून फिरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लक्षात राहणारा वाढदिवसपिस्तूल बाळगणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा त्याचा विचार होता. तत्पूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी खास पाहुणचार केल्याने त्याच्यासाठी वाढदिवस लक्षात राहणारा ठरला.