Kolhapur News: तीन हजार कोटींचे फसवणुकीचे गुन्हे, दोन अधिकारी अन् आठ कर्मचाऱ्यांवरच चालतो कारभार
By उद्धव गोडसे | Updated: December 9, 2025 16:26 IST2025-12-09T16:25:10+5:302025-12-09T16:26:30+5:30
तपासाला मनुष्यबळाचा अभाव, आर्थिक गुन्हे शाखेची स्थिती

Kolhapur News: तीन हजार कोटींचे फसवणुकीचे गुन्हे, दोन अधिकारी अन् आठ कर्मचाऱ्यांवरच चालतो कारभार
उद्धव गोडसे
कोल्हापूर : आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन अधिकारी आणि आठ कर्मचाऱ्यांकडून सध्या २२ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यातील बहुतांश गुन्हे शेकडो कोटींच्या फसवणुकीचे आहेत. दिवसेंदिवस यांची व्याप्ती वाढत असताना तपास मात्र, आवश्यक गतीने पुढे सरकत नाहीत. काही गुन्ह्यांचा तपास सहा-सात वर्षांपासून सुरू असून, अटकेतील आरोपी जामिनावर सुटून मोकाट फिरत आहेत. त्यांच्याकडून पुन्हा फसवणुकीचे गुन्हे होण्याची शक्यता असल्याने फिर्यादींकडून तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील मोठी रक्कम आणि त्याची व्याप्ती लक्षात घेऊन याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला जातो. गेल्या सात वर्षात २२ गुन्हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आले. यात मेकर ट्रेडिंग, ग्रोबझ, वेल्थ शेअर्स, एएस ट्रेडर्स, श्रीमंता बझार, बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी यासह बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनींची विक्री, खोटे दस्तऐवज तयार करून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे गुन्हे आहेत.
मेकर ॲग्रो, बनावट दस्तऐवज हे गुन्हे सहा-सात वर्षांपूर्वीचे आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे गृह कर्ज मिळवून देण्याच्या फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांचा तपास गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. एएस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास २०२२ पासून सुरू आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने फिर्यादी पुन्हा-पुन्हा पोलिस अधीक्षकांना तक्रार अर्ज देत आहेत.
सुमारे तीन हजार कोटींची व्याप्ती
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपासासाठी वर्ग झालेल्या गुन्ह्यांमधील फसवणुकीची व्याप्ती सुमारे तीन हजार कोटींवर आहे. एएस ट्रेडर्सच्या फॉरेन्सिक तपासातून फसवणुकीची रक्कम २३०० कोटींवर गेल्याचे स्पष्ट झाले. मेकर, ग्रोबझ, वेल्थ शेअर यासह हुपरी येथील राजेंद्र नेर्लीकर याने केलेल्या फसवणुकीचे आकडे शेकडो कोटींमध्ये आहेत. काही गुन्ह्यांमधील फसवणुकीची रक्कम अद्याप स्पष्टच झालेली नाही.
केवळ दोन अधिकारी अन् आठ कर्मचारी
सुमारे तीन हजार कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे तपासण्याची जबाबदारी केवळ दोन अधिकारी आठ कर्मचाऱ्यांवर आहे. पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे ११ गुन्हे आहेत, तर पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्याकडे ११ गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचा बहुतांश वेळ न्यायालयीन कामकाजातच जातो. त्यामुळे तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, गुन्ह्यांचे तपास रखडल्याचे दिसत आहे.
फक्त तपास सुरू असल्याचे समाधान
तपासातील प्रगतीची माहिती घेण्यासाठी फिर्यादी रोज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत चकरा मारतात. विशेष काही घडत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे. तपास सुरू असल्याचे त्यांना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. फक्त तपास सुरू असल्याचे समाधान त्यांना मिळते.
तपासावरील प्रमुख गुन्हे
गुन्हा - आरोपी - फसवणुकीची निष्पन्न रक्कम
- गृह कर्जाच्या आमिषाने फसवणूक (शाहूपुरी) - ५३ - १० कोटी
- खोट्या कागदपत्रांद्वारे कर्जपुरवठा (कोडोली) - ५ - साडेतीन कोटी
- मॉर्गन स्टॅनले शेअर ट्रेडिंग फसवणूक (जुना राजवाडा) - ४ - एक कोटी १५ लाख
- एएस ट्रेडर्स (शाहूपुरी) - ३२ - ४६ कोटी
- ग्लोबल डिजिटल (इचलकरंजी) - १६ - २० कोटी
- ग्रोबझ ट्रेडिंग (शाहूपुरी) - २४ - ९० कोटी