Kolhapur: प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची उच्च न्यायालयात धाव
By उद्धव गोडसे | Updated: March 6, 2025 12:44 IST2025-03-06T12:43:04+5:302025-03-06T12:44:21+5:30
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा ...

Kolhapur: प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची उच्च न्यायालयात धाव
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी जुना राजवाडा पोलिसांनीउच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा, या मागणीचा अर्ज आज, गुरुवारी सरकारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात दाखल केला जाणार आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कोरटकर गायब झाला आहे. त्याच्या अटकेसाठी दोन पथके नागपूरला गेली होती. मात्र, त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयात धाव घेऊन ११ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळवला. त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी जिल्हा पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी संपर्क साधून सरकारी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची परवानगी मिळवली. त्यानुसार गुरुवारी दुपारपर्यंत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून त्याचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली जाईल, असे निरीक्षक झाडे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरटकरच्या अटकेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौ-यादरम्यान निदर्शने करण्याचा इशारा इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच १० ते १२ जणांना ताब्यात घेतले. काही कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून, घरातून बाहेर पडताच अटकेची कारवाई करण्याचा इशारा त्यांना दिला आहे.