कोल्हापुरातील करवीर तहसीलचे काम अजूनही जमिनीखालीच, कामासाठी साडेदहा कोटींची तांत्रिक मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:14 IST2024-12-20T13:12:17+5:302024-12-20T13:14:39+5:30
आचारसंहितेमुळे रेंगाळले : आता कामाने घेतला वेग

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : येथील करवीर तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे रेंगाळत चाललेले काम जोथ्यापर्यंत आले आहे. आधी ढीगभर अडचणी आणि मध्येच आलेल्या लाेकसभा व विधानसभा आचारसंहितेमुळे हे काम रेंगाळले हाेते. पण आता मात्र पायाचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षभरात इमारत पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन आहे.
टाऊन हॉल समोरील करवीर तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली तसे या प्रकल्पामागे शुक्लकाष्ठ सुरू झाले. तेथे सातत्याने साचणारे पाणी, ड्रेनेज पाइपलाइनचा घोळ, हेरिटेज समितीची परवानगी, झाडे तोडण्यासाठीची परवानगी अशा विविध कारणांमुळे वर्क ऑर्डर निघून वर्ष झाले तरी करवीर तहसील कार्यालयाचे काम सुरू झाले. या कामाची वर्क ऑर्डर १ जानेवारी २०२३ साली देण्यात आली होती. या कामासाठी साडेदहा कोटींची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. अडचणींमुळे इमारत पाडल्यानंतर दीड वर्ष काम थांबलेच होते.
सगळ्या परवानग्यांची शर्यत पार केल्यानंतर जुलै महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र हा कालावधी भर पावसाळ्याचा. त्यामुळे काम संथगतीनेच सुरू होते. तोपर्यंत दिवाळीत विधानसभेची आचारसंहिता लागली. त्यात दीड महिना गेला. आचारसंहिता संपल्यानंतर आत्ता कुठे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. गुरुवारी पाहणी केली असता तेथे पायाभरणीसाठीचे पिलर तयार करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बांधकाम अजून जमिनीखालीच आहे. आता सगळ्या अडथळ्यांची शर्यत संपली आहे. निवडणुकीची आचारसंहिता नाही त्यामुळे किमान यापुढे तरी करवीर तहसीलचे काम वेगाने पुढे सरकेल, अशी अपेक्षा आहे.
वर्षाचे अल्टिमेटम..
करवीर तहसीलच्या कामाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसले तरी जिल्हा प्रशासनाचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व करवीर तहसील कार्यालयाकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला आहे. वर्षभरात ही इमारत उभी राहिली पाहिजे, असा अल्टिमेटमच दिला आहे.