Kolhapur: राजाराम बंधाऱ्यावरुन जीव धोक्यात घालून वाहतूक, बंधारा चौथ्यांदा गेला पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:18 IST2025-09-20T16:17:52+5:302025-09-20T16:18:30+5:30
बावडा पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे..

Kolhapur: राजाराम बंधाऱ्यावरुन जीव धोक्यात घालून वाहतूक, बंधारा चौथ्यांदा गेला पाण्याखाली
कसबा बावडा : गेली तीन दिवस पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली गेला. त्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक आता ठप्प झाली आहे. सायंकाळी पाच वाजता बंधाऱ्याजवळ १७ फूट इतकी पाणी पातळी होती.
धुवाधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत गेली दोन दिवस सातत्याने वाढ होत होती. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास बंधाऱ्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली. थोड्यावेळातच पाण्याची उंची अर्धा फुटाने वाढून ती १७ फुटावर गेली. अशा स्थितीतही बंधाऱ्यावरून वाहतूक सुरूच होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पाणी पातळी वाढल्याने वाहतूक बंद झाली. दरम्यान, बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने नेहमी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आता लांबचा वळसा टाकून जावे लागणार आहे.
बावडा पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे..
राजाराम बंधारा सलग दोन-तीन दिवस पाऊस पडल्यास लगेचच पाण्याखाली जातो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते म्हणून बंधाऱ्या शेजारीच नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. पण, गेली आठ वर्ष या ना त्या कारणाने पुलाचे काम रखडले आहे. हे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.