Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 16:41 IST2022-06-01T16:40:57+5:302022-06-01T16:41:39+5:30
आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा.

Chandrakant Patil: आमदारांवरील लयलुटीपेक्षा पूरग्रस्तांचे पैसे द्या, चंद्रकांत पाटलांचे उपहासात्मक आवाहन
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारकडून केवळ आमदार टिकवण्यासाठी लयलूट सुरू आहे. आमदार देखील जास्तीचे पदरात पाडून घेत आहेत. त्याचबरोबर किमान पूरग्रस्तांचे तरी पैसे द्या असे उपहासात्मक आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. पूरग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत आज, बुधवारी भाजपच्यावतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘टाहो मोर्चा’ काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, हे डोळे, कान बंद केलेले सरकार आहे. राज्यात कोणत्याही प्रश्नावर टाहो मोर्चा काढावा लागतो. २०१९ ला महापूर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून मदत केली. अगदी घरातील चिखल काढून, दुर्गंधी घालवण्यापर्यंत काम झालं. मी स्वत पाण्यात असताना मदतीचा शासन आदेश काढायला लावला. तळमजलावाल्यांना, मग सर्वच मजल्यावरील नागरिकांना मदत केली. दुकानदारांना मदत केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. जनावरांसाठी मदत केली.
राजू शेट्टी यांनीही सांगितले की २०१९ च्या शासन आदेशानुसारच २०२१ च्या पूरग्रस्तांना मदत द्या. परंतू ते महाविकास आघाडी सरकारला जमले नाही. आता १४ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. त्यातून काय करणार याची श्वेतपत्रिका काढा. पूर आल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी काम करायचं आणि पालकमंत्री झोपायला रिकामे असं चालणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.