Tripuri Purnima 2025: लक्ष दिव्यांनी तेजाळला कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:44 IST2025-11-06T15:42:14+5:302025-11-06T15:44:00+5:30
‘नो-लेझर’मुळे सौंदर्यात भर

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : पहाटेच्या शांत, निरभ्र आकाशात कार्तिक पौर्णिमेचा चंद्र. आपलेच सौंदर्य पंचगंगेच्या शांत प्रवाहात कौतुकाने न्याहाळत होता.... दिव्यांचा शांत, सोनेरी प्रकाश परिसरातील अंधकार दूर करून आपले तेज धरणीवर पसरत होता, आसमंत आतषबाजीच्या विविध रंगांनी नटला होता, रांगोळ्यांचा गालिचा दीपोत्सवाचे सौंदर्य वाढवत होता, तर भावगीतांचे मधुर स्वर रसिक मनाला मंत्रमुग्ध करत होते... कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने असा हा नेत्रदीपक सुखद सोहळा बुधवारी रंगला.
वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळी सणाची सांगता होते ती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीपोत्सवाने. हा दिवस कोल्हापूरकरांसाठी पर्वणीचा असतो, त्याचे कारण म्हणजे पंचगंगा नदीघाटावर रंगणारा दीपोत्सवाचा सोहळा. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहाटे चार वाजता मारुती मंदिरात आरती करून घाटावर दिवे लावण्यास सुरुवात झाली. त्याआधीच रात्रीपासून घाटावर सुरेख रांगोळ्या सजल्या होत्या. दिव्यांनी या रांगोळ्यांच्या सौंदर्यात भरच घातली.
शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याच्या ३५व्या वर्षी ५१ हजार पणत्या लावण्यात आल्या. त्यासाठी संस्थेचे ५० कार्यकर्ते कार्यरत होते. पाण्यातील मंदिरे व दीपमाळांवर व्हाइट आर्मीच्या कार्यकर्त्यांनी बोटीतून जाऊन दिवे लावले. भावभक्ती गंध ग्रुपच्या गायकांनी मराठी भावगीते सादर करून रसिकांची मने जिंकली.
‘नो-लेझर’मुळे सौंदर्यात भर
गेली काही वर्षे या दीपोत्सवाला ‘लेझर शो’चे ग्रहण लागले होते. त्यामुळे दिव्यांचा सोनेरी प्रकाश झाकोळला जाऊन फक्त लाइट इफेक्ट दिसायचे. यंदा मात्र ही चूक टाळत लेझर लाइट लावले नाहीत. बराच वेळ अंधार ठेवण्यात आला. त्यामुळे दिव्यांचे नैसर्गिक तेज आणि प्रकाशाने पंचगंगा नदीघाटाचा परिसर तेजाळून निघाला.