कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने विसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी स्थिर असली तरी पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली. रात्री ८ वाजता ३१.९ फुटावर पातळी होती. अद्याप ४६ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १४.७ मिलीमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक ३२.९ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात कोसळला.शनिवारी जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. दिवसभर ऊन पडल्याने पाऊस काहीशी विश्रांती घेईल असे वाटत होते. मात्र, रविवारी पहाटेपासून वातावरणात बदल झाला आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सकाळी १० वाजेपर्यंत अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. दुपारनंतर काहीशी उघडीप राहिली असली तरी ५ मिनिटेच पडलेल्या पावसाने पाणी पाणी व्हायचे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात ८३ मिमी, वारणा धरण क्षेत्रात ७२, तर पाटगाव धरण क्षेत्रात तब्बल १४५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांतून विसर्ग कायम आहे.
अलमट्टी, हिपरग्गीमधून विसर्ग कायमअलमट्टी धरणातून प्रतिसेकंद १ लाख ८ हजार, तर हिपरग्गी धरणातून १ लाख ७ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस सुरू असतानाही नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १२ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५ लाख ९५ हजारांचे नुकसान झाले आहे.अकरा मार्ग बंदनद्यांच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक मार्ग बंद आहेत. जिल्ह्यात ११ राज्य व जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्याशिवाय एसटीचेही काही मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.