धक्कादायक!, वर्षात दीड हजारांवर आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनक स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:01 IST2025-12-15T12:01:31+5:302025-12-15T12:01:56+5:30
बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले

धक्कादायक!, वर्षात दीड हजारांवर आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनक स्थिती
उद्धव गोडसे
कोल्हापूर : बेरोजगारी, अपेक्षाभंग, व्यसनाधिनता, दुर्धर आजार, आर्थिक चणचण आणि अपयशाने खचून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १५१० जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये झाली. विशेष म्हणजे यात २० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. सहज उठून जीवन संपवण्याची वृत्ती वाढल्याने मरण स्वस्त झाल्याचे दिसत आहे. मात्र, यावर कुटुंब, समाज आणि सरकारलाही वेळीच उपाययोजना कराव्या लागतील, असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.
दगड, विटा भरलेली सॅक पाठीवर बांधून जयसिंगपूरमधील एका डॉक्टरने राजाराम तलावात उडी घेतली. गोव्यातून आलेल्या गर्भवती महिलेने रंकाळ्यात उडी घेऊन जीवन संपवले. या दोन्ही घटना शनिवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमधील व्यक्ती सुशिक्षित होत्या. स्वतंत्र आणि साधकबाधक विचार करू शकणाऱ्या होत्या, तरीही त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून जीवन संपवले. चार दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेतला. गंगावेशीत एका वृद्धाने राहत्या अपार्टमेंटवरून उडी घेऊन स्वत:ला संपवले, तर पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथे ८२ वर्षीय वृद्धाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली.
या काही प्रातिनिधिक घटनांवरून वाढत्या आत्महत्यांची समस्या स्पष्ट होते. शालेय मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना जीवनातील संघर्ष नकोसा झाल्याचे दिसत आहे. आत्महत्या करण्यासाठी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरत आहेत. परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अभ्यासाच्या भीती, स्पर्धा परीक्षांमध्ये मिळालेले अपयश, अपेक्षाभंग, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद, व्यसनाधिनता आणि वाढते मानसिक तणाव आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
संवादाचा अभाव
सोशल मीडियातून आभासी संवादाची साधने वाढली तरी प्रत्यक्षात कुटुंब, नातेवाईक, मित्रांसोबत संवाद कमी झाला आहे. विशेषत: घरात मुलं आई-वडिलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. यातून मनाची घुसमट वाढते. त्यामुळे संकट काळात आत्महत्येची प्रवृत्ती वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गांभीर्याचा अभाव
गळफास, तणनाशक प्राशन करणे, स्वत:ला पेटवून घेणे, नदीत किंवा तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर बहुतांश वेळा आकस्मिक मृत्यू अशी नोंद पोलिसांच्या कागदोपत्री होते. आत्महत्यांची नेमकी आकडेवारी स्पष्ट होत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून ही समस्या गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसत आहे.
गेल्या चार वर्षांत ६,२७७ आत्महत्या
वर्ष - आत्महत्या
२०२२ - १,६४४
२०२३ - १,५१३
२०२४ - १,६१०
२०२५ - १,५१०
निराशावादी दृष्टिकोन, अपयश पचवता न येणे, कुटुंबातील कमी झालेला संवाद आणि वाढती स्पर्धा यामुळे तरुणांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या आणखी तीव्र होण्यापूर्वीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - कालिदास पाटील - मानसोपचार तज्ज्