निधी मागून आपलं रक्त आटलं : सतेज पाटील, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:51 IST2019-02-23T17:45:00+5:302019-02-23T17:51:14+5:30
राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला.

निधी मागून आपलं रक्त आटलं : सतेज पाटील, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण
कोल्हापूर : राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला.
उद्या हीच मंडळी आपल्याकडे निधी मागितलाच नाही म्हणतील तेव्हा महापौरांना माझी विनंती आहे की, त्यांनी निधी मागणीचे प्रस्ताव डीपीडीसी तसेच पालकमंत्री यांच्याकडे द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा प्रारंभ तसेच सौरऊर्जा उपकरणांचा लोकार्पण असा संयुक्त कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता; परंतु पालकमंत्री या कार्यक्रमास आले नाहीत. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.
कंपोनंट ब्लड बॅँकेसह सावित्रीबाई फुले रुग्णालयातील विविध सुविधांकरिता ‘डीपीडीसी’कडे निधीची मागणी केली; परंतु त्यांच्याकडून काही मिळाले नाही. त्यासाठी आपले रक्त आटले. त्यामुळे यापुढील काळात जर रुग्णांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील, तर महापालिकेच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद करावी. निधी देण्यासाठी तातडीने बैठक घ्या, असे आमदार पाटील म्हणाले.
महापालिकेच्या वतीने शवगृहाची सोय करावी, सावित्रीबाई फुले रुग्णालयात सीसीटीव्ही बसवावेत, सीटीस्कॅ न मशीन घ्यावे, लहान मुलांचे आयसीयू सुरू करावे. त्यासाठी लागणाऱ्या अडीच कोटींच्या निधीचा प्रस्ताव डीपीडीसीकडे द्या, असेही त्यांनी सुचविले.
महापौर मोरे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सुविधांचा स्तर उंचावला असल्याने त्याच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे सांगितले; तर उपमहापौर भूपाल शेटे यांनी पैशाअभावी येथील सेवा व सुविधा थांबणार नाहीत याची आपणाला खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगितले.
आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. तसेच आयुष्यमान योजनेत सावित्रीबाईचा फुले रुग्णालयाचा समावेश करावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तीन आॅपरेशन थिएटरसह अद्ययावत मशिनरी डोमलाईट, भुलीचे नवीन सयंत्र यासह हे रुग्णालय सुसज्ज झाल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, परिवहन समितीचे सभापती अभिजित चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील, विनायक फाळके उपस्थित होते.