सांगलीत सोमवारपासून गं्रथ महोत्सवाचे आयोजन
By Admin | Updated: December 24, 2015 00:43 IST2015-12-24T00:02:08+5:302015-12-24T00:43:22+5:30
नागनाथ कोत्तापल्ले उद्घाटक : तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगलीत सोमवारपासून गं्रथ महोत्सवाचे आयोजन
सांगली : माध्यमिक, प्राथमिक शिक्षण परिषद व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २८ डिसेंबरपासून सांगलीत ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते होणार आहे. सोमवार, दि. २८ डिसेंबरला सकाळी ग्रंथदिंडीने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीदिलीप पाटील यांच्याहस्ते दिंडीस सुरुवात होईल. यावेळी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते उद्घाटन होईल. दुपारी ‘वाचन संस्कृती आणि कविता’ या विषयावर प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान होणार आहे. याचदिवशी ‘शालेय जीवनाचा अन्वयार्थ’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात विजय गायकवाड, प्रा. जी. के. ऐनापुरे, अजिंक्य कुंभार, विजय कोगनोळे सहभागी होणार आहेत.
मंगळवार, दि. २९ डिसेंबरला दुपारी ‘कौशल्य विकासातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यात प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, बळवंत जेऊरकर, प्राचार्य अनिल खटावकर, कृष्णकांत खामकर सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता ‘पाठ्यपुस्तकातील साहित्यिक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात प्रा. डॉ. राजन गवस आणि प्रवीण बांदेकर यांची मुलाखत होणार आहे. दुपारी कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून यात भास्कर बंगाळे, रवी राजमाने, बापू जाधव कथा सादर करणार आहेत.
बुधवार, दि. ३० डिसेंबरला ‘आई समजून घेताना’ या विषयावर संपतराव गायकवाड मनोगत व्यक्त करणार आहेत. दुपारी ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील चर्चेत प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. संजय ठिगळे, डॉ. सुरेश माने, गौतम शिंगे सहभागी होणार आहेत. दुपारी पुस्तक परीक्षण स्पर्धा होणार आहे. महोत्सवाचा समारोप कार्यक्रम इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मंगळवारी कविसंमेलन
२९ डिसेंबरला सकाळी प्रा. सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून यात नारायण सुमंत, आबा पाटील, महेश कराडकर, दयासागर बन्ने आदी सहभागी होतील.