कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
By संदीप आडनाईक | Updated: May 25, 2025 22:48 IST2025-05-25T22:48:18+5:302025-05-25T22:48:39+5:30
पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून, मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
कोल्हापूर : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढील पाच दिवस म्हणजे दि. २९ मेपर्यंत कोल्हापुरात यलो आणि कोल्हापूर घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या ३६ तासांत कोल्हापूर शहर आणि घाट परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुढच्या दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे. दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून, मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागांत शेती पिकांना या पावसाचा फटकादेखील बसला आहे. कोल्हापुरात आज, २६ मेपासून २९ मेपर्यंत रोज एक ते दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तसेच कोल्हापूर आणि सातारा घाट क्षेत्रात एक दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.