कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोधच, ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:15 IST2025-07-26T19:15:31+5:302025-07-26T19:15:59+5:30
प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोधच, ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीतील पुढचा टप्पा पार पडला असून, कोल्हापूरशेजारील आठ ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला विरोध केला आहे. तशी पत्रे करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला दाखल करण्यात आली आहेत. ही सर्व गोपनीय पत्रे देण्यात आली असली तरी त्यातून या आठही ग्रामपंचायतींनी कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्यास विरोध दर्शवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार महापालिकेने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आठ गावांचा अहवाल पाठवण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत कार्यवाही होऊन करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून या गावांना हद्दवाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पत्र पाठवण्यात आले होते.
यानंतर उचगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, नवी उजळाईवाडी या गावांनी ठाम भूमिका घेऊन आपली भूमिका ठरावाद्वारे करवीर पंचायत समितीकडे कळवली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी आपले पत्र जोडून ही पत्रे शुक्रवारी जिल्हा परिषदेकडे पाठवली आहेत. या आठही गावांची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा महापालिकेला पाठवण्यात येणार असून, हद्दवाढ प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा यातून पूर्ण होणार आहे.