Kolhapur: शूटिंग रेंजमध्ये सरावासाठी किती नेमबाज येतात पाहून भाडेतत्त्वावरचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:27 IST2025-12-06T18:26:21+5:302025-12-06T18:27:49+5:30
अकॅडमीस रेंज देण्यास नेमबाजपटूंचा विरोध

Kolhapur: शूटिंग रेंजमध्ये सरावासाठी किती नेमबाज येतात पाहून भाडेतत्त्वावरचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंजमध्ये सरावासाठी किती नेमबाजपटू येतात, त्यांचे सरासरी प्रमाण किती आहे, याची माहिती क्रीडा खात्याकडून घेतली जाईल. शूटिंग रेंजची नियमावली ठरविली जाईल. त्यानंतर त्यातील लेन खासगी अकॅडमीला किती देता येऊ शकतील, याचा विचार केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नेमबाजपटूंच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय क्रीडाधिकारी आणि सरावासाठी येत असलेल्या नेमबाजपटूंची बैठक झाली. जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन नेमबाजपटूंनी धुडकावून लावत पुन्हा सायंकाळी बैठक घेऊन पुन्हा लढ्याची तयारी दर्शविली.
विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज तेजस्विनी सावंत अकॅडमीला देण्याचा जिल्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विचार आहे. या शूटिंग रेंजमधील काही लेन खासगी संस्थेला दिल्यास नेमबाजपटूंच्या सरावासाठी मर्यादा येणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षकांसाठी वारेमाप शुल्क आकारले जाणार आहे. नवनवीन सोयींच्या नावाखाली भविष्यात शुल्कात अनियमित वाढ होऊन त्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही, त्यामुळे खासगीकरण नकोच, अशी मागणी नेमबाजपटूंनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
त्यावेळी तुम्ही ‘खासगीकरण’ हा शब्द कसा वापरता, तुम्ही खासगीकरण केले जात आहे, असा अप्प्रचार सुरू केला आहे का, असे जिल्हा प्रशासनाने शिष्टमंडळाला विचारले. त्यानंतर नेमबाजपटूंचे सरासरी प्रमाण पाहता त्यानंतर निर्णय घेतला जाईल. तीन महिने प्रायोगिक तत्वावर अकॅडमीला देण्याचा विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या बैठकीस क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत उपस्थित होत्या.
बैठकीसाठी सात तास प्रतीक्षा
नेमबाजपटू या बैठकीसाठी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र अन्य बैठका सुरू असल्याचे सांगून त्यांना सायंकाळी पाच वाजता बैठकीसाठी बोलाविण्यात आले. बैठकीसाठी सुमारे सात तास प्रतीक्षा करावी लागल्याचे नेजबाजपटूंनी सांगितले.
बैठकीनंतरही सभा
जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन मान्य नाही. त्यामुळे या प्रकरणी लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. ही शूटिंग रेंज सरकारची रहावी, यासाठी सर्व नेमबाजपटू लढा देतील, असे नेमबाजपटूंनी बैठकीनंतर सांगितले..
पाठीमागून सुरा खुपसू नका : तेजस्विनी सावंत
खासगीकरण आणि भाडेतत्त्वावर हे दोन वेगळे विषय आहेत. बालेवाडी, दिल्ली येथेही शूटिंग रेंज भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्या व्यवस्थित चालू आहे. भाडेतत्त्वावरील नियम आणि अटी आहेत. त्याचे पालन दोघांनाही बंधनकारक आहे. त्यामुळे खासगीकरण हा अप्प्रचार आहे. काही लेन्स भाडेतत्त्वावर घेतल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळेल. त्यात नेमबाजपटूंचा फायदा आहे. देशभरातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अकॅडमी चालवितात. मग मी अकॅडमी चालविली म्हणून विरोध करण्याची काहीच गरज नाही. विरोध करणाऱ्यांनी खुली चर्चा करावी, पाठीमागून खंजीर खूपसू नये तसेच प्रशिक्षक नेमबाजपटूंकडून किती शुल्क घेतात, हे जाहीर करावे, असे आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.