Kolhapur: ‘ए. वाय.’ यांना बिद्रीत नेतृत्व करण्याची विरोधकांची ऑफर; सत्तारुढ गटाला भगदाड पाडण्याची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 14:02 IST2023-10-02T14:00:39+5:302023-10-02T14:02:07+5:30
मंडलिक, आबीटकर, समरजीत घाटगेंच्या हालचाली गतिमान

Kolhapur: ‘ए. वाय.’ यांना बिद्रीत नेतृत्व करण्याची विरोधकांची ऑफर; सत्तारुढ गटाला भगदाड पाडण्याची रणनीती
कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांत सत्तारुढ गटाला भगदाड पाडण्याची रणनीती खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर व ‘शाहू’कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आखली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक व ‘बिद्री’च्या राजकारणावर पकड असलेले ए. वाय. पाटील यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पॅनेलचे नेतृत्वच ‘ए. वाय. ’यांनी करावे, अशी खुली ऑफर दिल्याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात सुरू आहे.
‘बिद्री’ कारखान्याचे बिगुल येत्या दोन-तीन दिवसांत वाजणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेणार असल्याने सत्तारुढ व विराेधी आघाडीने जोरदार तयारी केली आहे. मागील पाच वर्षातील सत्तारुढ गटाचा व प्रशासकीय काळातील कामाचा लेखाजोखा मांडत विरोधकांनी ‘बिद्री’त प्रशासक काळच ‘लै भारी’ असा टोला लगावला. तर जिल्ह्यातील कारखान्यांची तुलना करत ‘बिद्री’त ‘के. पी.’च लै भारी असा पलटवार केल्याने निवडणूकीत जोरदार संघर्ष पहावयास मिळणार आहे. राज्यातील बदलेल्या समीकरणाचे पडसाद ‘बिद्री’ त उमटणार आहेत.
मागील निवडणूकीत के. पी. पाटील यांनी भाजप व जनता दलाला सोबत घेत विजयी सोपा केला होता. आता भाजप विरोधात जाणार असून त्यांची खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबीटकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. सत्तारुढ गटातील बड्या नेत्यांवर त्यांची नजर असून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये काहीसे अस्वस्थ असलेले ए. वाय. पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न आहे. संजय मंडलिक, समरजीत घाटगे व ए. वाय. पाटील यांच्यात बैठक झाली असून यामध्ये त्यांना विरोधी पॅनेलच्या नेतृत्वाची ऑफर दिल्याचे समजते. ‘ए. वाय.’नी विरोधकांशी हातमिळवणी केली तर निवडणूकीत सत्तारुढ गटाची दमछाक होणार हे निश्चित आहे.
काहीच मिळत नसेल तर ‘रिस्क’ घ्या
राष्ट्रवादी कॉग्रेसने ए. वाय. पाटील यांना आश्वासनापलिकडे काहीच दिलेले नाही. २५-३० वर्षे ‘बिद्री’सह सर्वच राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्यासोबत राहून मिळण्यापेक्षा खच्चीकरणच झाल्याची भावना झापेवाडी (ता. राधानगरी) येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. काहीच मिळत नसेल तर ‘रिस्क’ घ्या ,असा दबाव कार्यकर्त्यांचा पाटील यांच्यावर आहे.