Saundatti Yatra: सौंदत्ती यात्रेदिवशी मंदिराचे सर्व दरवाजे खुले करा; रेणुका भक्त संघटनांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:08 IST2025-11-15T14:07:18+5:302025-11-15T14:08:22+5:30
बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Saundatti Yatra: सौंदत्ती यात्रेदिवशी मंदिराचे सर्व दरवाजे खुले करा; रेणुका भक्त संघटनांची मागणी
कोल्हापूर : डिसेंबर महिन्यातील मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सौंदत्ती यात्रेदिवशी मंदिरातील प्रवेशाचे सर्व दरवाजे खुले करावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्यावतीने बेळगावजिल्हाधिकारी मोहमद राेशन व जिल्हा पाेलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गोळेद यांच्याकडे केली.
यावर्षी १ ते ४ डिसेंबर या कालावधीत सौंदत्ती यात्रा होत आहे. ३ डिसेंबरला यात्रेचा मुख्य दिवस असून चारही दिवस मंदिरातील प्रवेशाचे सर्व दरवाजे खुले केले तर भाविकांना दर्शन घेताना कोणतीही अडचण होणार नाही. या यात्रेला कोल्हापूर शहारातून हजारो भाविक सौंदत्तीला जातात. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी संघटनेच्या वतीने बेळगाव प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत.
शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष अच्युत साळोखे, उपाध्यक्ष सरदार जाधव, कार्याध्यक्ष सुभाष जाधव, तानाजी चव्हाण, दयानंद घबाडे, केशव माने, गजानन विभूते, आनंदराव पाटील, मोहन साळोखे, युवराज मोळे, रमेश बनसोडे, शालिनी सरनाईक, लता सोमवंशी आदी उपस्थित होते.
संघटनेने केलेल्या मागण्या
- मंदिर परिसरात शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा करावा.
- बंदिस्त टॉयलेटची सोय करावी.
- जोगण भावी कुंडावरील शॉवरना व सार्वजनिक टॉयलेटना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा.
- कोल्हापुरातून येणाऱ्या भाविकांच्या एस.टी. पार्किंगची सोय करावी.
- पोलिस खात्याकडून होणारा त्रास कमी व्हावा.
- चोऱ्यांसह इतरांकडून होणारा भाविकांना त्रास बंद करावा.
- मंदिरातील निवेदकाने मराठीतून निवेदन करावे.