कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२८ ला होणार पुन्हा मतदारसंघांची तोडमोड

By समीर देशपांडे | Updated: June 19, 2025 18:08 IST2025-06-19T18:07:20+5:302025-06-19T18:08:03+5:30

नेत्यांकडून अंदाज घेणे सुरू

One MP, three MLAs will be added to Kolhapur district; Constituencies will be divided again in 2028 | कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२८ ला होणार पुन्हा मतदारसंघांची तोडमोड

कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; २०२८ ला होणार पुन्हा मतदारसंघांची तोडमोड

समीर देशपांडे

कोल्हापूर : केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली असून, येणारी लोकसभा आणि विधानसभा नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्याची राजकीय रचना पुन्हा एकदा बदलणार आहे. याआधी २००९ साली सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती.

२००९ आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे १२ आमदार होते. गडहिंग्लज आणि सांगरूळ हे दोन विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात विधानसभेच्या दहाच जागा शिल्लक राहिल्या. आता पुन्हा केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली आहे. ती २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे.

सध्या असलेल्या दहा मतदारसंघांपैकी कमीतकमी मतदारसंख्या असलेला कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ असून, सर्वात जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ आहे. कोल्हापूर उत्तरची मतदारसंख्या ३ लाख १ हजार असून, दक्षिणची मतदारसंख्या ३ लाख ७२ हजार इतकी आहे. कोणत्याही मतदारसंघातील मतदारसंख्येपेक्षा ३० टक्क्यांनी जादा त्या मतदारसंघातील लोकसंख्या असते.

सध्याचे विधानसभा मतदारसंघ हे साडेतीन लाख ते चार लाख लोकसंख्येमागे एक असे आहेत, परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एक आमदार देण्यापेक्षा अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र नव्याने ठरत असून, हे सूत्र वास्तवात आल्यास जिल्ह्यात १६ आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार, असे सूत्र ठरवल्यास १३ आमदार संख्या होईल.

नेत्यांकडून अंदाज घेणे सुरू

जिल्ह्यातील विद्यमान आमदार, खासदार आणि नेत्यांनी या संभाव्य बदलाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून, काहींनी निवडणूक आयोगातील निवृत्त अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचे संभाव्य चित्र काय असू शकते, याचा अंदाज या नेत्यांना आल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही विभागांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची पद्धत या नेत्यांनी अवलंबली आहे.

१२ लाख लोकसंख्येला एक खासदार

जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाखांहून अधिक असून, १२ लाख लोकसंख्येला एक खासदार असे नवे सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला लोकसभेचा तिसरा खासदार मिळण्याची शक्यता वाढली आहे.

२०११ नुसार जिल्ह्यातील तालुकावार लोकसंख्या

  • हातकणंगले ४,९४,७४७
  • करवीर ४,८८,४७७
  • शिरोळ ३,२०,१३३
  • पन्हाळा २,५६,२९६
  • कागल २,३०,०७२
  • गडहिंग्लज १,९८,५४९
  • राधानगरी १,९९,७१३
  • चंदगड १,८७,२२०
  • शाहूवाडी १,८०३२२
  • भुदरगड १,५०,३६८
  • आजरा १,२०,२६५
  • गगनबावडा ३५,७७२

Web Title: One MP, three MLAs will be added to Kolhapur district; Constituencies will be divided again in 2028

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.