जयसिंगपूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दीड वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. स्वरा अजय पोवार (वय दीड वर्ष, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. अपघाताची ही घटना सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी (ता. शिरोळ) येथे धर्मनगर येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.अपघातात वडील अजय राम पोवार (वय ३२) व आई शीतल अजय पोवार (वय २८) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अजय व शीतल पोवार हे पती-पत्नी दुचाकीवरून कोल्हापूरहून माधवनगर (जि. सांगली) येथे मंगळवारी रात्री जात होते. यावेळी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील चिपरी (ता. शिरोळ) येथील धर्मनगर येथे आल्यानंतर अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला. यात दीड वर्षाची स्वरा ही जागीच ठार झाली. तर पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चिमुकली स्वरा ही जागीच ठार झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दीड वर्षाची चिमुकली ठार, पती-पत्नी जखमी; सांगली-कोल्हापूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:58 IST