Navratri 2024: अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात अवतरली अंबाबाई, कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 11, 2024 18:51 IST2024-10-11T18:50:14+5:302024-10-11T18:51:44+5:30
रात्री अंबाबाईची नगर प्रदक्षिणा

Navratri 2024: अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात अवतरली अंबाबाई, कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात शुक्रवारी महाअष्टमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. यादिवशी देवीने महिषासुराचा वध केल्याने अष्टमीला अंबाबाईची याच रूपात पूजा बांधली जाते. उद्या, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौकात ऐतिहासिक शाही दसरा सोहळा होणार आहे.
आदिशक्ती, स्त्रीशक्ती दुर्गेच्या आराधनेतील शारदीय नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून महाअष्टमीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी देवीने महिषासुराचा वध केला. आपल्या भक्तांना अभय दिले. म्हणून या दिवशी देवीची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली. यादिवशी अंबाबाईची नगर प्रदक्षिणा निघते. अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजवलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरवासीयांच्या भेटीला निघते.
शाही दसरा सोहळा
उद्या शनिवारी खंडेनवमी व दसरा आहे. मात्र अष्टमीच्या जागरामुळे अंबाबाई मंदिर सकाळी उशिरा उघडेल. दुपारच्या आरतीनंतर आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी जात असलेल्या रथारुढ रुपातील देवीची पूजा बांधली जाईल. सायंकाळी ५ वाजता अंबाबाईची तसेच तुळजाभवानी देवीची पालखी शाही लव्याजम्यानिशी निघेल. भवानी मंडप, भाऊसिंगजी रोड मार्गे मिरवणूक ऐतिहासिक दसरा चौकात येईल. येथे खासदार शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन होईल. बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली जाईल. त्यानंतर सीमोल्लंघनाचा सोहळा होईल.