Kolhapur News: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मानाची सासनकाठी जोतिबा डोंगरावर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:43 IST2023-03-22T17:43:10+5:302023-03-22T17:43:30+5:30

श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत महापूजा 

On the auspicious occasion of Gudi Padwa Manachi Sasankathi entered the Jotiba mountain | Kolhapur News: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मानाची सासनकाठी जोतिबा डोंगरावर दाखल

Kolhapur News: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मानाची सासनकाठी जोतिबा डोंगरावर दाखल

दत्तात्रय धडेल

जोतिबा : जोतिबा डोंगरावर गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निगवेतील हिम्मतबहाद्दरांची मानाची सासनकाठी जोतिबा डोंगर दाखल झाली. जोतिबाची सरदारी पगडी महापुजा बांधून नवीन वर्षाचे पंचाग वाचन करण्यात आले.          

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच जोतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीने सजवून दिमाखात उभ्या केल्या. 

श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत महापूजा 

दरम्यान, मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली. सकाळी अकरा वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहाद्दूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीने डोंगरावर दाखल झाली. मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचविली. सासनकाठीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी संग्रामसिंह चव्हाण, रणजितसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, लोकनियुक्त सरपंच राधा बुणे, केदारलिंग देवस्थान समितीचे अधीक्षक दिपक म्हेत्तर, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित होते. 

गुलाल-खोबऱ्याची उधळण 

मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या. त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली. दुपारी १२ वाजता तोफेच्या सलामीने श्री चे मुख्य पुजारी यांचे हस्ते नवीन वर्षाचे पंचागाचे पुजन करण्यात आले. ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी नवीन पंचांगाचे वाचन केले. गुळलिंब वाटप करण्यात आला.

चैत्र यात्रेचे नियोजन

दरम्यान प्रत्येक गावोगावी चैत्र यात्रा सासनकाठी मिरवणुकीतील सासनकाठ्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उभ्या केल्या. निनाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (ता. कऱ्हाड), छत्रपती (करवीर), कवठेगुलंद (सांगली), मनपाडळे (हातकणंगले), फाळकेवाडी, दरवेश पाडळी, सांगली, सातारा, कऱ्हाड, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, लातूर आदी भागातील मानाच्या सासनकाठ्या उभ्या करून त्या त्या गावात जोतिबा चैत्र यात्रेसाठी केव्हा जायचे, याचे नियोजन केले.

Web Title: On the auspicious occasion of Gudi Padwa Manachi Sasankathi entered the Jotiba mountain