आंबेवाडी येथे दुचाकीच्या धडकेत जवाहरनगरमधील वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 18:50 IST2021-02-26T18:48:50+5:302021-02-26T18:50:49+5:30
Accident Kolhapur- दुचाकीने दिलेल्या धडकेत आंबेवाडी (ता. करवीर) येथे पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. मारुती सदाशिव कांबळे (वय. ६५, रा. जमादार कॉलनी, जवाहरनगर) असे त्यांचे नाव आहे. दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

आंबेवाडी येथे दुचाकीच्या धडकेत जवाहरनगरमधील वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर : दुचाकीने दिलेल्या धडकेत आंबेवाडी (ता. करवीर) येथे पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. मारुती सदाशिव कांबळे (वय. ६५, रा. जमादार कॉलनी, जवाहरनगर) असे त्यांचे नाव आहे. दुचाकीवरील दोघे जखमी झाले.
सुनील रावण चौगुले (वय २५) आणि बळवंत गुंडा चौगुले (वय ३४, दोघे रा. कोतोलीपैकी माळवाडी, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात घडला. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात सुरू होते.
कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथून काम आटोपून सुनील आणि बळवंत हे दुचाकीवरून कोतोलीकडे जात होते. आंबेवाडी येथे आले असताना त्यांच्या दुचाकीने तेथील रस्त्यावरून चालत निघालेल्या मारुती कांबळे यांना धडक दिली.
त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या सुनील आणि बळवंत यांनाही उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.