अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कल्पकम अणुप्रकल्पाच्या उभारणीत बजावली होती मोठी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:59 IST2025-09-17T11:58:58+5:302025-09-17T11:59:30+5:30

अणुशास्त्रात भरीव योगदान दिलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व

Nuclear scientist Padma Shri Dr Shivram Bhoje passes away, played a major role in setting up the Kalpakam nuclear project | अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कल्पकम अणुप्रकल्पाच्या उभारणीत बजावली होती मोठी कामगिरी

अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कल्पकम अणुप्रकल्पाच्या उभारणीत बजावली होती मोठी कामगिरी

काेल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी कल्पकम अणुप्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचललेले पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३) यांचे मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास राजारामपुरीतील राजाराम रायफल्स परिसरातील निवासस्थानी निधन झाले. वयोमानानुसार तब्येत बिघडल्याने आणि अशक्तपणामुळे ते काही दिवस रुग्णालयात दाखल होते. त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला होता; परंतु मंगळवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.

भोजे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. यांतील दोन मुली बंगळुरू आणि एक मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे. मुली आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात ठेवण्यात आले. अणुशास्त्रात भरीव योगदान दिलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

भोजे हे मूळचे कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील. दि. ९ एप्रिल १९४२ रोजी जन्मलेल्या भोजे यांनी गावातील मराठी शाळेतच शिक्षण घेतले आणि माध्यमिक शिक्षणासाठी कागल येथील शाहू हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. येथील राजाराम महाविद्यालय आणि नंतर पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीओईपीमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. भाभा अणुसंशोधन केंद्रावर वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झालेल्या भोजे यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली १९६८ साली कामाला सुरुवात केली.

याच काळात अणुसंयत्र निर्मितीसाठी भारताने फ्रान्सशी करार केला होता. पाहणीनंतर साराभाई यांनी भारतात तामिळनाडू कल्पकम येथे तसा प्रकल्प उभारण्याचे ठरवले. त्यासाठी निवडलेल्या पथकामध्ये भोजे यांचाही समावेश होता. भारत सरकारकडून प्रकल्पाला परवानगी मिळाल्यानंतर भोजे कल्पकमला रवाना झाले. मात्र अनेक अडचणींमुळे निम्म्याच क्षमतेचा प्रकल्प १९८५ मध्ये तयार झाला. १९८८ मध्ये हा पूर्ण प्रकल्प चालवण्याची जबाबदारी भोजे यांच्यावर देण्यात आली. या प्रकल्पातील अनेक दोष दूर करून सर्व यंत्रणांशी समन्वय साधत काम सुरू झाले आणि १९९७ मध्ये या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू झाली.

अशाच एका माेठ्या प्रकल्पाची उभारणी सुरू करून २००४ मध्ये भोजे निवृत्त झाले. त्यावेळी त्यांच्याकडे ‘संचालक, न्यूक्लिअर सिस्टम डिव्हिजन’ आणि ‘संचालक, रिॲक्टर ऑपरेशन डिव्हिजन’ अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या.

प्रचंड बुद्धिमत्ता, जबाबदारीची पदे

या प्रकल्पांची उभारणी करतानाही कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भोजे यांनी २०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले. सन १९८७ ते ९७ या काळात ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगात भारताचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. २००० ते २००४ या काळात ते आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या महासंचालकांच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांच्या या कार्याची दखल घेेऊन १९९२ मध्ये वास्विक पुरस्कार प्रदान करण्यात आला; तर १९९५ मध्ये इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअर्समध्ये ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली. पॉवर इंजिनिअर असोसिएशनने त्यांना सर विश्वेश्वरय्या पुरस्काराने, तर २०१३ साली डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित केले होते. २००४ ते २००७ या काळात ते शिवाजी विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक सल्लागार होते.

१५० रुपयांच्या शिष्यवृतीचा आधार

पुण्यातील सीईओपीमध्ये भोजे शिकत असताना त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. पहिल्या वर्षी त्यांना चांगले गुण मिळाले आणि त्यांनी ‘मेरिट कम मिन्स’ या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यांना १५० रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली. त्या काळात इंजिनिअरिंगची वर्षाची पूर्ण फी १५० रुपये होती. त्यामुळे त्यांना या शिष्यवृत्तीचा पुढे दोन वर्षेही मोठा आधार मिळाला.

लेखांच्या माध्यमातून जनजागरण

सन २००८ साली भारतावर अणुकराराचा दबाव आला. त्यात राजकीय पातळीवर अनेक लढे लढले गेले. या दरम्यान अणुऊर्जेवर शास्त्रीय विवेचन करणारे सुमारे ४० लेख डॉ. शिवराम भोजे यांनी लिहिले आणि ते विविध नियतकालिकांमधून प्रकाशितही झाले.

Web Title: Nuclear scientist Padma Shri Dr Shivram Bhoje passes away, played a major role in setting up the Kalpakam nuclear project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.