अबब, कोल्हापुरात ‘हापूस’ पेटीचा दर २५ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 02:26 IST2020-02-18T02:26:01+5:302020-02-18T02:26:32+5:30
५२० रुपयाला एक आंबा : ‘मालवण हापूस’ला १५ हजार दर; खराब हवामानामुळे पहिल्या बहराला गळती

अबब, कोल्हापुरात ‘हापूस’ पेटीचा दर २५ हजार रुपये
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीस तब्बल २५ हजार रुपये दर मिळाला. देवगड व मालवण येथून हापूस आंब्याच्या तीन पेट्यांची आवक झाली होती. त्यातील देवगड हापूसची एक पेटी (चार डझन) रतन छेडा यांनी तब्बल २५ हजार रुपयांना खरेदी केली. त्यामुळे विकास फणसेकर यांच्या एका आंब्याला ५२० रुपये दर मिळाला. विशेष म्हणजे बाजार समितीमधील आतापर्यंतचा हा उच्चांकी दर आहे.
बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये दस्तगीर मकबूल बागवान यांच्या अडत दुकानात विकास फणसेकर (कोचरा, देवगड) या शेतकऱ्याची एक हापूस पेटी, इकबाल मेहबूब यांच्या दुकानात अक्षय देवळेकर (देवगड) व सचिन गोवेकर (कुंभारमठ, मालवण) या शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक पेटी आणली होती. दुसरी देवगड हापूस पेटी गणेश वळंजू यांनी २१ हजार रुपयांना खरेदी केली, तर मालवणी हापूसची पेटी प्रशांत भोसले यांनी १५ हजार रुपयांना खरेदी केली.
खराब हवामानामुळे आंब्याच्या पहिल्या बहराची मोठ्या प्रमाणात गळती झाली. मात्र, दुसरा बहार चांगला आहे. तरीही गेल्या वर्षीपेक्षा यंदा आंब्याचा दर चांगला राहणार हे निश्चित आहे.
- मोहन सालपे, सचिव, कोल्हापूर बाजार समिती