Now eat a cup after drinking tea, making biscuit cup in Kolhapur | काय सांगता! आता चहा पिऊन झाल्यावर कप बिनधास्त खा, कोल्हापुरात बिस्किट कपची निर्मिती

कोल्हापुरातील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे यांनी राजेश खामकर यांच्या मदतीने पर्यावरणपूरक बिस्कीट कपची निर्मिती केली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देपुढील टप्प्यात वडापाव, पिझ्झा, आदींसाठीच्या प्लेटस्, बाऊल्स निर्मिती करण्याचं ध्येयसर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत खाण्यायोग्य कप निर्मितीचा निर्णयसध्या शहरातील काही कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये या बिस्कीट कपचा ते पुरवठा करीत आहेत

कोल्हापूर : कॅफे, रेस्टॉरंटमध्ये अथवा टी-स्टॉलवर चहा, कॉफी पिऊन झाल्यानंतर त्याचा कागदी कप सर्रासपणे टाकून दिला जातो. मात्र, कोल्हापुरात आता चहा, कॉफी घेतल्यानंतर त्याचा कपही खाता येणार आहे. येथील युवा अभियंते दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे, राजेश खामकर यांनी पर्यावरणपूरक बिस्कीट कपची निर्मिती करून प्लास्टिक, कागदी कपला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

एडिबल कटलरी निर्मितीची संकल्पना मॅकेनिकल इंजिनिअर दिग्विजय यांना सुचली. त्यावर याबाबतची माहिती त्यांनी ऑनलाईन शोधली. त्यातून हैदराबाद, गुजरातमध्ये उत्पादित होणारे खाण्यायोग्य चमचे, कप त्यांनी मागविले. त्याचा दीड वर्षे अभ्यास केला. त्यातून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत खाण्यायोग्य कप निर्मितीचा निर्णय त्यांनी घेतला.

लॉकडाऊनच्या कालावधीत हैदराबादमधून या कप निर्मितीसाठीचे मशीन बनवून घेतले. त्यानंतर मित्र आदेश (सिव्हीअल इंजिनिअर), राजेश (इलेक्ट्रीकल इंजिनिअर) यांच्या साथीने त्यांनी बिस्कीट कपची निर्मिती जानेवारीपासून सुरू केली आहे. सध्या शहरातील काही कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये या बिस्कीट कपचा ते पुरवठा करीत आहेत. पुढील टप्प्यात वडापाव, पिझ्झा, आदींसाठीच्या प्लेटस्, बाऊल्स आदींची निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

झिरो वेस्ट तत्त्वावर निर्मिती

मॅग्नेट एडिबल कटलरी या ब्रँडच्या माध्यमातून या बिस्कीट कपची निर्मिती आम्ही केली आहे. त्यासाठी मित्र सिद्धार्थ बुधवंत, युवराज राऊत यांचीही मोठी मदत झाली. पालकमंत्री सतेज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, विजय सूर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस यांचे सहकार्य लाभले. मैदा, साखर, कॉर्न फ्लॉवर, इसेंस, आदींच्या वापरातून झिरो वेस्ट तत्त्वावर तयार केलेला हा कप एक महिन्यापर्यंत वापरता येतो. त्याची किंमत अडीच रुपये आहे. चहा, कॉफी, आदी पेय घेतल्यानंतर हा कप चवीने खाऊ शकतो. कचरा म्हणून टाकल्यास त्यामुळे पर्यावरणाला धोका होत नसल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.

स्वत: मशीन निर्मिती करणार

परवडणाऱ्या दरात आणि मोठ्या प्रमाणात या बिस्कीट कपचे उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कप निर्मितीचे तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे मशीन बनविण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. त्याचा आराखडा तयार झाला असून येत्या चार महिन्यांमध्ये हे मशीन बाजारपेठेत आम्ही उपलब्ध करून देणार असल्याचे दिग्विजय यांनी सांगितले.
 

Web Title: Now eat a cup after drinking tea, making biscuit cup in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.