वनतारा अधिकारी कोल्हापुरी, हत्तीण देण्याची तयारी; केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:26 IST2025-08-02T12:26:24+5:302025-08-02T12:26:34+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय

Now a legal battle will have to be fought for the Mahadevi elephant of Nandani Math kolhapur | वनतारा अधिकारी कोल्हापुरी, हत्तीण देण्याची तयारी; केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे 

वनतारा अधिकारी कोल्हापुरी, हत्तीण देण्याची तयारी; केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे 

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे गुजरातमधील वनतारामध्ये पाठविण्यात आलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसाठी आता न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. हत्तीण मठाकडे परत येण्यासाठी केंद्र शासनाच्या वन विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. त्यासाठी केंद्राकडे जिल्ह्यातील दोन्ही खासदारांकडून पाठपुरावा करून कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.

केंद्र शासन, राज्य शासन व वन विभागाच्या सहकार्याने सर्वोच्च न्यायालयात ताकदीने लढा दिला जाईल. त्यासाठी वनताराचेदेखील सहकार्य असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराचे वरिष्ठ अधिकारी व नांदणी मठाचे मठाधीश यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.

नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल नांदणीकरांसोबतच कोल्हापूरवासियांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यातूनच बाॅयकाॅट जिओ, १ लाख सह्यांची मोहीम सुरू झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक व धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून शुक्रवारी वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली.

मात्र, नांदणीतील वातावरण बघता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राहुल आवाडे, अशाेकराव माने, सांगलीचे आमदार सुरेश खाडे आदी उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले, महादेवीसोबत जैन बांधवांसह समस्त कोल्हापूरकरांच्या भावना जुळल्या असल्याने ती वनतारामध्ये गेल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तिला परत कोल्हापुरात आणायचे असेल तर कायदेशीर प्रक्रियाच करावी लागेल.

केंद्र शासनाच्या वन विभागातर्फे सकारात्मक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे लागेल. त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या पाठपुराव्याने केंद्राकडून कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. शर्थीचे प्रयत्न केले जातील. या प्रक्रियेसाठी वनताराकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर महादेवीला परत आणण्यात अडचणी येणार नाहीत.

नांदणी मठाधीश निघून गेले..

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात लोकप्रतिनिधी व अधिकारी असले, तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲन्टी चेंबरमध्ये फक्त नांदणीचे महाराज व वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातच चर्चा झाली. अर्ध्या-पाऊण तासाने नांदणीचे मठाधीश बैठकीतून दालनाबाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. कोणाशीही संवाद न साधता ते गाडीत बसून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ नांदणी ग्रामस्थदेखील गेले.

कोल्हापूरकरांची गर्दी.. कडेकोट बंदोबस्त

वनताराची टीम जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याचे समजताच कार्यालयाबाहेर नांदणी ग्रामस्थांसह कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. नांदणीचे मठाधीश बाहेर आल्यानंतर नागरिकांनी हत्तीसाठी घोषणा दिल्या. दुसरीकडे कार्यालयाबाहेर व दालनाबाहेरदेखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एसआरपीएफ जवान, वर्दीतील पोलिस तसेच साध्या वेशातील पोलिसदेखील येथे मोठ्या प्रमाणात तैनात होते.

नांदणीऐवजी कोल्हापुरात

वनताराची टीम मठाधीश यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी नांदणीला निघाली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना नांदणीला जाण्यापासून थांबवले. सध्या हत्तीच्या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष असून, तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मधला मार्ग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे ठरले. दुपारी पावणे तीन वाजता दोन्ही खासदारांसह वनताराची टीम व त्यानंतर नांदणीचे महाराज आले.

वनताराचा संबंध नाही..

वनताराबद्दल कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड रोष आहे. याबद्दल पालकमंत्री म्हणाले, वनतारा हे हत्ती संगोपन केंद्र आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर महादेवीला कुठे ठेवायचे? हा विषय पुढे आल्यानंतर वनताराचा पर्याय पुढे आला. त्या पलीकडे वनताराचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. उलट कोल्हापूरकरांना लागेल ती मदत वनताराकडून केली जाणार आहे.

राजकारण नको..

महादेवी हत्तीणीविषयी जैन धर्मियांमध्ये आपुलकीची भावना आहे. या भावनिक मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये.

आता माघार नाही! १३०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या मठातील महादेवीसाठी संघर्ष सुरू

Web Title: Now a legal battle will have to be fought for the Mahadevi elephant of Nandani Math kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.