कोल्हापुरात 'सीपीआर'मधील उशिरा येणाऱ्या तब्बल ३० डॉक्टरांना नोटिसा, नव्या अधिष्ठातांची मध्यरात्री अचानक भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:14 IST2025-11-08T18:14:12+5:302025-11-08T18:14:26+5:30
सुरक्षारक्षक झोपलेला

कोल्हापुरात 'सीपीआर'मधील उशिरा येणाऱ्या तब्बल ३० डॉक्टरांना नोटिसा, नव्या अधिष्ठातांची मध्यरात्री अचानक भेट
कोल्हापूर : वेळेत न येणाऱ्या सीपीआरच्या तब्बल ३० डॉक्टरांना नूतन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी नोटिसा काढल्या आहेत. यामध्ये अनेक विभागप्रमुख आणि ज्येष्ठ प्राध्यापकांचा समावेश असल्यामुळे सीपीआरमध्ये खळबळ उडाली आहे. याही पुढे जात डॉ. भिसे यांनी बुधवारी मध्यरात्री दीड वाजता सीपीआरमध्ये राऊंड घेतला आणि झोपलेल्या सुरक्षारक्षकाचे फोटोही काढले.
गेल्याच आठवड्यात डॉ. भिसे यांनी अधिष्ठाता पदाचा कार्यभार घेतला आहे. सोमवारपासून त्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरूवात केली. बुधवारी रात्री अचानकच दीड वाजता सीपीआर गाठले. कोणालाही न सांगता त्यांनी हा राऊंड घेतला. यावेळी येतानाच सुरक्षारक्षक झोपलेला त्यांना पाहावयास मिळाला. त्याचा फोटोही डॉ. भिसे यांनी काढला. त्यानंतर त्यांनी अनेक विभागांची पाहणी केली. याच पद्धतीने गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी सीपीआरचा राऊंड घेतला.
यावेळी अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरांची वाट पाहत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी अनेक रुग्णांशी चर्चा केली. तेव्हा नेहमीच डॉक्टर उशिरा येत असल्याचे अनेकांनी सांगितले. याबद्दल त्यांनी अधिक चौकशी केली असता, अनेकजण साडेनऊ, दहा वाजेनंतरच येतात, असे सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी दोन्ही दिवसांत ३० डॉक्टरांना नोटिसा काढल्या. यामुळे त्यांची ही धडक मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी त्यांनी तुळशी इमारतीसह हृदय शस्त्रक्रिया विभाग, ट्रामा, टूडी इको विभागासह अन्य विभागांना भेटी दिल्या आणि अनुपस्थित डॉक्टरांची नावे लिहून घेतली.
सकाळी ८:३० ते २ सीपीआर सोडायचे नाही
डॉक्टरांनी सीपीआरमध्ये येण्याची वेळ सकाळी ८:३० ते दुपारी २ आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यावेळेत सर्व डॉक्टर्स सीपीआरमध्येच पाहिजेत, असे डॉ. भिसे यांनी निक्षून सांगितले आहे. याबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राऊंडवेळी कोणीच बरोबर नाही
बुधवारी मध्यरात्री डॉ. भिसे यांनी एकट्यानेच सीपीआरमध्ये राऊंड घेतला. त्यामुळे अनेकांनी त्यांना ओळखलेही नाही. राऊंडच्या वेळी बोलावले तर येईन, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या एका डॉक्टरलाही त्यांनी या राऊंडपासून लांब ठेवले असल्याचे समजते.
हजेरीपत्रकावर अनुपस्थित शेरा
शुक्रवारी राऊंडच्या दरम्यान जे डॉक्टर आणि कर्मचारी अनुपस्थित आढळले, त्यांची हजेरीपत्रके मागवून त्यावर ‘अनुपस्थित’ असा शेरा डॉ. भिसे यांनी मारण्यास सांगितला. तसेच वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
सीपीआर आणि एकूणच कामकाजाची माहिती व्हावी, यासाठी राऊंड सुरू आहेत. तो दैनंदिन कामाचाच भाग आहे. याबाबत ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत, त्याबाबत संबंधितांकडे विचारणा करण्यात येत आहे. - डॉ. सदानंद भिसे , अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर