कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 12:40 IST2023-07-01T12:39:09+5:302023-07-01T12:40:30+5:30
नियुक्त्यांबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

कोल्हापूरचे पालकमंत्री नव्हे, ते तर पर्यटनमंत्री; भाजप पदाधिकाऱ्यांचा केसरकरांवर हल्लाबोल
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे शुक्रवारी स्पष्ट झाले. सध्याचे पालकमंत्री हे पर्यटनमंत्री असल्यासारखे वागत असून, त्यांच्या निष्क्रियपणामुळे कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी यासारख्या पदांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रखडलेल्या नियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना विचारणा केली.
भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांच्याकडे प्रलंबित नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी या विषयात लक्ष न दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेले अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
सुधारित अध्यादेशानुसार नव्याने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचा अधिकार पालकमंत्री व स्थानिक प्रशासनाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांचे पत्र मिळताच नियुक्त्या तत्काळ करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भाजप शिष्टमंडळ लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही पदे त्वरित जाहीर करावी, अशी मागणी करणार आहे.
'लोकमत'च्या वृत्ताचा संदर्भ
विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याबाबत शासनाने बदललेल्या पद्धतीची बातमी केवळ लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचा संदर्भ देऊन या पदाधिकाऱ्यांनी यानुसार कार्यवाही का सुरू नाही, असा सवाल उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहविभाग अजूनही २०१५ च्या अध्यादेशानुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीचे काम करत असल्याचे दिसून आल्यानंतर शिष्टमंडळाने अद्ययावत मे २०२३ च्या सुधारित अध्यादेशाची प्रिंट काढून त्यांना सुपुर्द केली.