शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलण्याची कोणाची हिंमत नाही, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:40 IST2025-09-01T12:37:41+5:302025-09-01T12:40:03+5:30
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही

शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलण्याची कोणाची हिंमत नाही, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत
कोल्हापूर : शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना त्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळ व संसदेत बोलण्याची कोणामध्ये हिंमत नाही, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्यावतीने गजरौला (उत्तर प्रदेश) किसान-मजदूर स्वाभिमान महापंचायत मेळाव्यात ते बोलत होते. सरदार व्ही. एम. सिंग मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये स्थिर आयात-निर्यात धोरण, संशोधन केंद्रांचे आधुनिकीकरण, किमान हमीभाव कायदा, पायाभूत सुविधा या गोष्टींची कृषी क्षेत्रात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये स्थिरता निर्माण होणार नाही. स्वातंत्र्यावेळी ३४ कोटी जनतेला पोटभर पुरेल एवढे धान्य उत्पादित होत नव्हते. आज जवळपास १५० कोटी जनतेला पुरेल एवढे धान्य उत्पादित करून अनेक उत्पादनांची निर्यात केली जात आहे.
अनेक संकटांचा सामना करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व कच्छपासून ते मेघालयपर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतातील शेतकऱ्यांच्या खांद्यावर देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले टॅरिफ वॅार, युद्धजन्य परिस्थिती अशा काळात देशातील १५० कोटी जनतेला दोनवेळ पुरेल एवढे धान्य निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी देशभरातील शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.