मोकळी हवा, सुरक्षेचे ठेवा भान, अन्यथा गॅस गिझर ठरेल काळ; आजऱ्यातील नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:54 IST2025-06-17T11:53:08+5:302025-06-17T11:54:33+5:30

बंद बाथरूममध्ये धोका जास्त

Newlyweds die of suffocation from gas geyser in Ajara sparking panic among those using gas geysers at home | मोकळी हवा, सुरक्षेचे ठेवा भान, अन्यथा गॅस गिझर ठरेल काळ; आजऱ्यातील नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर भीती 

मोकळी हवा, सुरक्षेचे ठेवा भान, अन्यथा गॅस गिझर ठरेल काळ; आजऱ्यातील नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर भीती 

कोल्हापूर : आजरा येथे सोमवारी सकाळी गॅस गिझरने गुदमरून नवदाम्पत्याचा मृत्यू झाला. अनेक लोक घरोघरी गॅस गिझर वापरतात. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. गॅस गिझरमुळे गुदमरून (सफोकशन) मृत्यू होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कार्बन मोनोऑक्साइड विषबाधा व ऑक्सिजनची कमतरता. हे अनेकदा बंद बाथरूममध्ये किंवा अयोग्य वायुविजन असलेल्या जागांमध्ये घडते.

बाजारात सरासरी साडेपाच ते दहा हजारांपर्यंत चांगल्या कंपन्यांचे गॅस गिझर उपलब्ध आहेत. सरासरी गॅसच्या एका टाकीपासून आठ हजार लिटर पाणी तापते. गॅस गिझर वापरायला सुरक्षितच असतो; परंतु लोक त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. पाइपमधून गॅस जात असतो किंवा रेग्युलेटरपासूनही गळती असते तेव्हा लोक त्याच्याकडे पाहत नाहीत. त्यातून दुर्घटना घडत असल्याचे येथील गॅस गिझरचे वितरक तानाजी पोवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वाचा - गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू, पोलिस तपास सुरु

गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू कसा होतो?

  • गिझरमध्ये जेव्हा गॅस जळतो. जर जळणं पूर्ण नसलं, तर कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. हा गॅस गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत विषारी असतो.
  • शरीरातील रक्तातली ऑक्सिजनची जागा कार्बनडाय ऑक्साइड घेतो आणि मग मेंदू व इतर अवयवांमध्ये ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे व्यक्तीला चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो, बेशुद्ध पडतो आणि नंतर मृत्यू होतो.


खर्च वाचवण्यासाठी..

ज्यांची घरी गॅस गिझर आहे, त्यांनी तो मोकळ्या हवेत ठेवायला हवा. गॅसटाकीही मोकळ्या हवेतच ठेवण्याची गरज असते; परंतु तेथून कनेक्शन बाथरूममध्ये आणण्यासाठी प्लम्बिंगचा खर्च येतो तो वाचवण्यासाठी लोक बाथरूममध्येच ही व्यवस्था करतात. ती काहीवेळा जीवघेणी ठरू शकते.

लक्षणे (मृत्यू होण्याआधी) :
• डोकेदुखी
• चक्कर येणे
• मळमळ/उलटी
• थकवा आणि अशक्तपणा
• श्वास घेण्यास अडचण
• बेशुद्ध पडणे

बचावासाठी उपाय :

  • बाथरूममध्ये चांगलं वायुविजन असावं.
  • गिझर शक्यतो बाथरूमच्या बाहेर लावावा.
  • दरवर्षी गिझरची सर्व्हिसिंग करून घ्यावी.
  • कार्बन मोनोऑक्साईड डिटेक्टर लावावा.
  • गिझर चालू असताना खूप वेळ बाथरूममध्ये राहू नये.


आपत्कालीन परिस्थितीत हे करा..

  • व्यक्ती बेशुद्ध आढळल्यास ताबडतोब बाथरूमचे दरवाजे, खिडक्या उघडा
  • गॅस बंद करा
  • व्यक्तीला बाहेर मोकळ्या हवेत आणा
  • त्यास तत्काळ रुग्णालयात दाखल करा.

Web Title: Newlyweds die of suffocation from gas geyser in Ajara sparking panic among those using gas geysers at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.