कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर उपसा केंद्रात आता नवीन पंप, किती कोटी खर्च होणार..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:18 IST2024-12-16T16:17:49+5:302024-12-16T16:18:02+5:30
काळम्मावाडी पाईपलाईनला पर्यायी व्यवस्थेसाठी महापालिकेची तयारी

कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर उपसा केंद्रात आता नवीन पंप, किती कोटी खर्च होणार..वाचा
प्रकाश पाटील
कोपार्डे : पाईपलाईनला गळती, वीज यंत्रणा खंडित होणे असे वारंवार येणारे अडथळे येत आहे. काळम्म्मावाडी थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा रामभरोसे झाल्याने महापालिकेने भविष्यात थेट पाईपलाईनच्या पाणीपुरवठ्यात मोठा बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून फेब्रुवारीत बंद केलेल्या शिंगणापूर उपसा केंद्रात नवीन विद्युत पंप व कपॅसिटर बसवण्यास सुरू केले आहे. यासाठी चार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
काळम्मावाडी थेट पाईपमधून शहराला पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शिंगणापूर येथील उपसा केंद्र बंद केले होते. पण थेट पाईपलाईनमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. महापालिकेला शहरवासीयांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर उपसा केंद्रातील जुने विद्युतपंप बदलून त्या ठिकाणी नवीन ३ विद्युतपंप बसविण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने ५४० एचपीचे ३ विद्युत पंप, मोटर फिडर पॅनल सेटसह ७ एचटी कपॅसिटर कंट्रोलर, सुभाषनगरसाठी १०० एचपी मोटर पंपासह मोटर कंट्रोल पॅनल बसविण्यात येणार आहे.
यामध्ये शिंगणापूर मधील ३ मोटरपंप व मोटर फिडर पॅनलसाठी २ कोटी ९९ लाख, ७ कपॅसिटर पॅनल व एचटी कंट्रोलसाठी ३० लाख, सुभाषनगरमधील विद्युतपंप व कंट्रोल पॅनलसाठी ७० लाख असा ३ कोटी ९९ लाख रुपये खर्च येणार आहे. यातील १ मोटर व कपॅसिटर पॅनल यांसाठी येणारा खर्च महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधीतून करण्यात येणार आहे. उर्वरित खर्च महानगरपालिका करणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार आहे.
पम्पिंग हाऊस येथे पंपांची स्थिती अशी
शिंगणापूर पम्पिंग हाऊस येथे एकूण ७ पंप आहेत. आपटेनगरसाठी ५ पंप यामध्ये ३ कार्यरत आहेत, ४था पाण्याच्या पातळीनुसार चालू-बंद केला जातो. १ स्टँडबाय आहे. २ कसबा बावड्यासाठी आहेत. त्यातील १ चालू, १ स्टँडबाय असे मिळून ४३५ एचपीचे ५ पंप, ५४० एचपीचा १ पंप व ७१० एचपीचा १ पंप आहे.
काळम्मावाडी पाईपलाईनला गळतीची समस्या वारंवार उद्भवत असल्याने भविष्यात जर 'थेट'मध्ये मोठा बिघाड झाला तर शहरवासीयांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये यासाठी पूर्वतयारी म्हणून शिंगणापूर उपसा केंद्रात तयारी करत आहोत. -हर्षजित घाटगे, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिका