Kolhapur: जोतिबा मंदिरात सेवेसाठी नवा उंट; राजस्थानच्या सिरोहीमधून देण्यात आला देणगीदाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:58 IST2026-03-24T12:58:18+5:302026-03-24T12:58:46+5:30
जोतिबा मंदिरात नवीन उंटाचे औक्षण करून गुलालाची उधळण करून आणि ‘चांगभलं’च्या गजरात वाजत-गाजत उंटाचे स्वागत

छाया : संतोष साखरे
पोर्ले तर्फ ठाणे : दख्खनचा राजा जोतिबाच्या धार्मिक विधी आणि जोतिबा मंदिरात सेवेसाठी नवीन उंट दाखल झाला आहे. नवीन उंट आठ वर्षांचा असून, तो राजस्थानच्या सिरोहीमधून देणगीदाखल देण्यात आला आहे.
जोतिबा मंदिरात नवीन उंटाचे औक्षण करून गुलालाची उधळण करून आणि ‘चांगभलं’च्या गजरात वाजत-गाजत उंटाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, पुजारी, भाविकांसह महिला उपस्थित होत्या. रविवारी दुपारी व रात्री निघणाऱ्या पालखीपुढे उंट आणि घोडा यांना विशेष मान आहे.
जोतिबा डोंगरावरील केदारलिंगाच्या पालखी सोहळ्यासाठी तोफ, घोडा-उंट आणि महाघंटा यांनाही विशेष मान आहे. धार्मिक पुजनादरम्यान पालखीपुढे घोडा तर मागे उंट असतो. यापूर्वी जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या पालखी धुपारती सोहळ्यामध्ये ‘पुष्कर’ नावाचा उंट होता.
तो वयोवृद्ध झाल्याने त्याठिकाणी आता नवीन उंट सेवेसाठी दाखल झाला आहे. ‘जय’ नावाचा घोडा सध्या जोतिबाच्या पालखी सेवेत हजर असतो. यावेळी पुजारी सुमित उपाध्ये, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते.