कोल्हापूर - शनिवारची रम्य सायंकाळ, विकेंडचा निवांतपणा, जुनी गाणी नव्या रूपात.. त्यात कधी प्रेमाचा बहर, कधी दु:खाची झालर, मधूनच हिंदी गाण्याचा तडका, लावणीचा ठसका.. अशा रसिक मनाच्या भावविश्वाला हिंदोळा देत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांनी कोल्हापूरकर रसिकांना शनिवारी अक्षरश: शब्दसुरांच्या झुल्यावर झुलवले. या मराठी-हिंदी गाण्यांना दर्दी श्रोत्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात टाळ्या, शिट्ट्या आणि वन्समोअरने दाद दिली. अखेरचे गाणे सादर होईपर्यंत रसिकांना या गायकीने खिळवून ठेवले. निमित्त होतं ‘लोकमत’च्यावतीने आयोजित सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय पुरस्कार साेहळ्याचे.
सायबर महाविद्यालयाच्या आनंदभवनमध्ये अडीच तासांहून रंगलेल्या या गीतमैफलीने रसिकांना दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमाचा सर्वोच्च आनंद दिला. भक्ती, प्रेम, समुद्राची खोल अनुभवावी असे भावविश्व असे सगळे मानवी भावभावनांचे इंद्रधनुषी रंग या निमित्ताने उधळले गेले. बऱ्याच दिवसांनी कोल्हापूरकरांनी सर्वांगसुंदर मैफल सजवली. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाची वेळ होती. मात्र, चार वाजल्यापासून कोल्हापूरकरांची पावले सभागृहाकडे वळली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बासरी वादक एस. आकाश यांच्या बहारदार बासरीवादनानेच रसिकांना डोलायला लावले. शास्त्रीय संगीतप्रेमी रसिकांनाही आनंद दिला. दर्दी रसिकांनी अगदी मान हलवत, हातवारे करत या गायनाची प्रशंसा केली.
सभागृहाला भेदणारा आवाज
सूर ज्योत्स्ना पुरस्कार स्वीकारल्यानंतर विदुषा मंजुषा कुलकर्णी यांनी पहाडी आवाज लावत म्हणलेल्या अबीर गुलाल या भक्तिगीताच्या दोनच ओळींनी त्यांच्या गानप्रतिभेची प्रचिती दिली. त्यांचा आवाज सभागृहाच्या भिंतींनाही भेदून गेला. पंडित विनोद डिग्रजकर यांच्या काटा रुते कुणाला या पदाने वर्षानुवर्षांच्या साधनेने त्यांच्या गळ्यातील गायकी थाट अनुभवता आला. या दोन्ही कलाकारांनी ‘लोकमत’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा, खासदार शाहू छत्रपती यांनी कौतुक केले.
जुनी गाणी नव्या सूरसाजमध्ये
या कॉन्सर्टमध्ये राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे यांनी जुन्या गाण्यांना नव्या ढंगात पेश केले. वर्षानुवर्षे आपण ऐकलेली गाणी इतक्या वेगळ्या पद्धतीने आणि अत्याधुनिक सुरेल संगीताच्या तालावर सादर होत असल्याने रसिकांसाठी ही मेजवानी ठरली. अगदी श्री गणेशावर सादर केलेल्या पहिल्या गाण्यापासून मैफलीच्या सांगतेच्या गाण्यापर्यंत त्यांनी हा बाज कायम ठेवला. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेलाच; पण अखेरपर्यंत सभागृह भरलेले होते हे कार्यक्रमाचे यश होते. विशेष म्हणजे या गीतांना शास्त्रीय सुरांची साथ होती.
हम बेवफा...
राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या हम बेवफा हरगिज न थे...पर हम वफा कर न सके... या शालीमार चित्रपटातील किशोर कुमार यांनी त्या काळी गायलेल्या गाण्यावर रसिकांनी सभागृह डोक्यावर घेतले. प्रियांका बर्वे यांच्या ‘मला म्हणत्यात हो.. पुण्याची मैना’ या दिलखेचक लावणीवर वाजलेल्या शिट्ट्यांनी कोल्हापूरकरांच्या लावणीप्रेमाची प्रचिती दिली.
Web Summary : Rahul Deshpande and Priyanka Barve captivated Kolhapur with reimagined old Marathi and Hindi songs at the Sur Jyotsna event. The audience responded with cheers and applause, enjoying a musical evening filled with devotion, love, and classic melodies. The event was organized by Lokmat.
Web Summary : राहुल देशपांडे और प्रियंका बर्वे ने सूर ज्योत्स्ना कार्यक्रम में पुराने मराठी और हिंदी गानों को नए अंदाज़ में पेश कर कोल्हापुर के दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। भक्ति, प्रेम और क्लासिक धुनों से भरी संगीतमय शाम का दर्शकों ने तालियों और सीटियों से स्वागत किया। कार्यक्रम लोकमत द्वारा आयोजित किया गया था।