नारीशक्तीचा संदेश, रोज ७०० किलोमीटरचा प्रवास; कोल्हापूरच्या नीलमची कारगिल ते कन्याकुमारी बाइक राइड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:35 IST2025-08-07T12:34:20+5:302025-08-07T12:35:26+5:30
कारगिल, जम्मू, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांतून प्रवास करीत महाराष्ट्रात दाखल झाली

नारीशक्तीचा संदेश, रोज ७०० किलोमीटरचा प्रवास; कोल्हापूरच्या नीलमची कारगिल ते कन्याकुमारी बाइक राइड
कोल्हापूर : बंगळुरू येथे खासगी कंपनीत सेक्रेटरी पदावर काम करणारी मूळची कोल्हापूरची नीलम जगदीश सारडा ही तरुणी कारगिल ते कन्याकुमारी बाइक राइड करीत आहे. सुमारे चार हजार किलोमीटर प्रवास एकटीने करत ती नारीशक्तीचा संदेश देत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी ती कोल्हापुरात पोहोचणार आहे. घरी एक दिवसाची विश्रांती घेऊन पुढे ती कन्याकुमारीकडे रवाना होणार आहे.
कोल्हापुरातील नीलम सारडा या तरुणीचा बाइक राइडिंग हा छंद आहे. लाँग राइड आणि डर्ट ट्रॅकमध्येही तिने आपले कौशल्य सिद्ध केले आहे. जम्मू-काश्मीर सरकारने गेल्या महिन्यात कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जम्मू ते कारगिल वुमन बाइक रॅलीत तिने देशातील २५ महिलांसह सहभाग घेतला होता.
२६ जुलैला कारगिलमध्ये पोहोचताच तिने कारगिल ते कन्याकुमारी बाइक राइड करण्याचा निर्धार केला. त्यानुसार ती कारगिल, जम्मू, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांतून प्रवास करीत महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गुरुवारी (दि. ७) सायंकाळी तिचे कोल्हापुरात स्वागत केले जाणार आहे.
रोज ७०० किलोमीटरचा प्रवास
कारगिल ते कन्याकुमारी या प्रवासात नीलम रोज किमान ७०० किलोमीटर प्रवास करीत आहे. या मार्गावरील तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन ती नारीशक्तीचा संदेश देते. अनेक ठिकाणी नागरिकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. तिचा अर्ध्याहून अधिक प्रवास पूर्ण झाला असून, आता तिचे लक्ष्य कन्याकुमारीवर केंद्रित झाले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.