चोऱ्या टाळण्यासाठी सतर्कता हवी

By Admin | Updated: December 5, 2014 23:37 IST2014-12-05T20:53:37+5:302014-12-05T23:37:49+5:30

प्रकाश पवार : दोडामार्ग तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत आवाहन

Need to be alert to avoid thieves | चोऱ्या टाळण्यासाठी सतर्कता हवी

चोऱ्या टाळण्यासाठी सतर्कता हवी

दोडामार्ग : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शाळा रात्रीच्यावेळी फोडून चोरी करण्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन दोडामार्गचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी केले.तालुक्यात पंधरा दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरट्यांनी माध्यमिक शाळांना लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर उपस्थित होते.
चोऱ्यांचे वाढते प्रकार रोखण्याकरिता शाळा, हायस्कूल, महाविद्यालय येथे रात्रीच्यावेळी पुरेशी विजेची सोय करावी, दोन शिपाई वा सुरक्षारक्षक ठेवावेत, त्यांना शाळेच्या आवारात गस्त घालण्याबाबत सूचना कराव्यात, एखाद्यावर संशय आल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, शाळेतील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या. गटशिक्षण अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)


परप्रांतीय कामगारांची नोंद ठेवावी
कसई- दोडामार्ग शहरात कामाधंद्यानिमित्त मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आले आहेत. जे भाडेतत्त्वावर खोल्या घेऊन शहरात स्थायिक झाले आहेत. अशा सर्व कामगारांची आणि परप्रांतीय लोकांची नोंद ठेवण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांतर्फे संतोष नानचे यांनी केली आहे.


दोडामार्ग सरपंचांचे पोलिसांना निवेदन
चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कसई- दोडामार्ग शहरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी सरपंच संतोष नानचे यांनी दोडामार्ग पोलिसांकडे केली. यावेळी व्यापारी मंडळाचे तालुकाध्यक्ष लवू मिरकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पणवेलकर, अमित प्रसादी, सागर चांदेलकर, नितीन मणेरीकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Need to be alert to avoid thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.