Kolhapur: चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची, एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची; दोन दिवसांत होणार बैठक
By राजाराम लोंढे | Updated: May 14, 2025 19:11 IST2025-05-14T19:11:29+5:302025-05-14T19:11:59+5:30
टीका करणाऱ्यांच्या दारात कोणत्या तोंडाने जायचे?

Kolhapur: चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची, एकत्र आल्यास पदाधिकाऱ्यांची गोची; दोन दिवसांत होणार बैठक
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गेली दीड वर्षे एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवणाऱ्यांची गोची झाली असून राष्ट्रवादीचे मनोमिलन नेत्यांसाठी सोयीचे असले तरी पदाधिकाऱ्यांना मात्र ते मरण वाटू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांना घेऊन बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही आमदारांसह बहुतांशी नेत्यांनी त्यांनाच साथ दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचा झेंडा हातात घेण्यासाठी कोणी मिळते की नाही? अशी परिस्थिती होती. त्यावेळी, उद्योगपती व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी जुन्या, नव्यांना एकत्र करत पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला चढवला होता. विधानसभेनंतरही झालेल्या प्रत्येक मेळाव्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्यासाठी पक्षांतर्गत मोठा दबाव आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपण निर्णयप्रक्रियेतून बाजूला झालो असून याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्णय घ्यावा, असे वक्तव्य करून त्यांनी एकत्रिकरणाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. दोन्ही गट एकत्र झाले तर ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या दारात कोणत्या तोंडाने जायचे? अशी भावना शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आहे.
दोन दिवसांत बैठक; निर्णय शक्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुखांची दोन दिवसात मुंबईत बैठक आहे. त्यामध्ये, मनोमिलनावर चर्चा होणार असून त्यानंतरच निर्णय होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पक्षाध्यक्ष शरद पवार हे काय निर्णय घेणार आहेत, हे माहिती नाही. त्यांनी वेगळा निर्णय घेतला तरी येथील पदाधिकाऱ्यांची मानसिकता मनोमिलनाची नाही, आम्हाला सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, हे पक्षाच्या बैठकीत सांगू. - व्ही. बी. पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे. ते मुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे. सर्व बाबींचा विचार करूनच ते योग्य निर्णय घेतील. - बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)