कोल्हापूर : ग्रामीण भागातील अवैध नळकनेक्शन पुन्हा जोडून ती नियमित करण्याच्या विषयावरून बुधवारी महानगरपालिका सभागृहात पाणी पेटले. ‘कोणी शहाण्याने सांगण्याची गरज नाही... दादागिरी चालणार नाही... कसा बी ये... खाली चौकात ये’ असे आव्हान-प्रतिआव्हान देत शिंदेसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यातील धुमसत असलेला वादाचा भडका उडाला. फरास यांनी चक्क सभागृहात शड्डू ठोकत देशमुख यांना आव्हान दिले. महापौर रूपाराणी निकम यांनी ‘हे झोपडपट्टीतील भांडण्याचे ठिकाण नाही, सभागृह आहे’ याचे सदस्यांनी भान ठेवावे, अशा शब्दात सुनावले.ग्रामीण भागात देण्यात आलेली सर्व नळकनेक्शन काही वर्षापूर्वी तोडण्यात आली आहेत, पण अलीकडे ही सर्वच कनेक्शन नागरिकांनी जोडून पाणी घेत आहेत. जर पाणी घेतच असतील तर त्यांची कनेक्शन नियमित करून त्यांना बिलं द्यावीत, त्यातून उत्पन्न मिळेल, असा सदस्य ठराव शारंगधर देशमुख, अक्षय जरग, मुरलीधर जाधव यांनी सदस्य ठराव मांडला होता. त्याला आदिल फरास यांनी जोरदार आक्षेप घेतला.फरास काय म्हणत होते..? : पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे, म्हणून ग्रामीण भागातील नळकनेक्शन नियमित करावीत, असे देशमुख सांगत होते, तर फरास यांनी आधी शहराच्या सर्व भागात पाणी द्या, मग ग्रामीण भागाचा विचार करा असे सांगत होते. त्यातूनच पुढे आव्हान-प्रतिआव्हान देण्याचे रामायण घडले.देशमुख-फरास वार-पलटवार‘वाद वाढल्यानंतर आम्हाला कोणी शहाणपण शिकवू नये. तीन पिढ्या महापालिकेत काम करत आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे हे आम्हाला चांगले माहीत आहे’, असे फरास म्हणताच देशमुख यांनीही ‘आम्हालाही कोणी शहाणपण शिकवू नये’, असा पलटवार केला. फरास कमालीचे संतप्त होऊन बोलत असताना विजय जाधव, विशाल शिराळे, रत्नेश शिरोळकर यांनी फरास यांना शांत करण्याचा, जागेवर बसण्याचा आग्रह करत होते. महापौर निकम यांनीही मध्यस्थी करत दोघांना जागेवर बसण्याचे निर्देश दिले. दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. फरास यांनी तर सभागृहात शड्डू ठोकत ‘खाली चौकात ये’ असे आव्हान दिले. तर देशमुख यांनी ‘कसा बी ये’ असे प्रतिआव्हान दिले.आमचे म्हणणे ऐकून न घेताच जर ग्रामीण भागातील कनेक्शन जोडलीत तर आम्ही गावात जाऊन ती तोडू, असा इशारा फरास यांनी दिला. तर त्यावर देशमुख यांनी ‘हिंमत असेल तर तोडून बघ’ अशा शब्दात प्रतिइशारा दिला. या सगळ्या प्रकाराने महापौर निकम भलत्याच संतप्त झाल्या. ही झोपडपट्टीत भांडण्यासारखे ठिकाण नाही, सभागृह आहे याचे भान सदस्यांनी ठेवावे, अशा शब्दात त्यांनी दोघांना सुनावले.
ग्रामीण भागात नवीन कनेक्शन देण्याचा विषय नाही. सध्या जे लोक चोरून पाणी वापरत आहेत. त्यांची कनेक्शन अधिकृत करा म्हणजे त्यातून महापालिकेला पैसे मिळतील. त्यांच्या (फरास) भागातील विषय वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे. त्याची गल्लत करण्यात येत आहे. - शारंगधर देशमुख, गटनेते, शिंदेसेनाग्रामीण भागाला पाणी देण्याचा माझा विरोध नाही. आम्ही कर भरतोय, पाण्याची बिले भरतोय म्हणूनच आधी आमच्या हक्काचे पाणी द्या. समान पाणी वाटप करा. आमच्या घरात पाणी येत नसताना ग्रामीणला पाणी देणे योग्य नाही. - आदिल फरास, गटनेते, राष्ट्रवादी
Web Summary : Kolhapur Municipal Corporation witnessed a heated debate over illegal water connections. Sharangdhar Deshmukh and Adil Faras engaged in a face-off, even issuing challenges. The mayor intervened, urging members to maintain decorum.
Web Summary : कोल्हापुर नगर निगम में अवैध जल कनेक्शन को लेकर तीखी बहस हुई। शारंगधर देशमुख और आदिल फरास के बीच तकरार हुई, यहां तक कि चुनौतियां भी दी गईं। महापौर ने हस्तक्षेप कर सदस्यों से शालीनता बनाए रखने का आग्रह किया।