Kolhapur ZP Election 2026: कोरेंनी डिवचले, हसन मुश्रीफ यांनी उट्टे काढले; राष्ट्रवादीची पन्हाळा, शाहूवाडीत मुसंडी

By समीर देशपांडे | Updated: February 11, 2026 18:26 IST2026-02-11T18:24:13+5:302026-02-11T18:26:25+5:30

जनसुराज्यच्या गडाला हादरे

NCP leader Ajit Pawar group Minister Hasan Mushrif gave a shock to MLA Vinay Kore In the Kolhapur Zilla Parishad elections | Kolhapur ZP Election 2026: कोरेंनी डिवचले, हसन मुश्रीफ यांनी उट्टे काढले; राष्ट्रवादीची पन्हाळा, शाहूवाडीत मुसंडी

Kolhapur ZP Election 2026: कोरेंनी डिवचले, हसन मुश्रीफ यांनी उट्टे काढले; राष्ट्रवादीची पन्हाळा, शाहूवाडीत मुसंडी

समीर देशपांडे

कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांनी गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात जनसुराज्यचा उमेदवार देऊन हसन मुश्रीफ यांना डिवचले. बरोबर दोन महिन्यांत मुश्रीफ यांनी कोरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील १० पैकी ४ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणून त्याचे उट्टे काढले.

मुश्रीफ हे आपला मतदारसंघ आणि भुदरगड, चंदगड सोडून अन्य कोणत्या तालुक्यात लक्ष घालत नाही ही टीका गेली २० वर्षे सहन करणाऱ्या मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सीमोल्लघंन केले आणि विजयाचे सोने लुटूनच ते परत आले. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक जागांवर विजयी होण्याचा मान त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळवून दिला आहे. गतवेळी राष्ट्रवादीचे ११ उमेदवार निवडून आले होते. त्यामध्ये तब्बल ९ जागांची यंदा वाढ झाली आहे.

एकीकडे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांची रणधुमाळी सुरू असताना या दोन्ही ठिकाणी कितीही ताकद लावली तरी राष्ट्रवादीच्या मर्यादा चांगल्या पद्धतीने माहिती असलेल्या मुश्रीफ यांनी आपले सर्व लक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीवर केंद्रित केले. ज्यावेळी भाजपची संपूर्ण ताकद कोल्हापूरमध्ये महापौर बसवण्यासाठी कार्यरत होती. त्यावेळी मुश्रीफ यांनी शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदरात माप कसे जास्त पडेल याच्या जोडण्यांना सुरुवात केली.

वाचा: अध्यक्षपद कागल की गडहिंग्लजला?, राजकीय वर्तुळात उत्सुकता

त्यातील पहिला टप्पा म्हणजे माजी आमदार राजेश पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्यात समेट घडवून आणला. याही पुढे जात भाजपमधील संग्रामसिंह कुपेकर यांना राष्ट्रवादीत घेऊन कुपेकरांत एकी घडवून आणली. त्यामुळे चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील मोठी मतविभागणी टळली. चन्नेकुपीचे प्रकाश चव्हाण आणि पुतण्या अमर चव्हाण यांच्यातील एकीही उपयोगाची ठरली.

परिणामी, चंदगड तालुक्यातील चारपैकी तीन जागी आणि गडहिंग्लज तालुक्यातील पाचपैकी चार जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. आजरा तालुक्यात आधीच योग्य उमेदवार निश्चित करून जोडण्या लावल्या. कागल तालुक्यातील निम्म्या जागा घेण्याचे आधीच ठरले होते. त्यामुळे निम्म्या जागा या चार तालुक्यांतूनच निवडून आल्या.

जनसुराज्यच्या गडाला हादरे

दिवंगत आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे नातू डॉ. जयंत पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी देणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या बंधूंची उमेदवारी, तसेच यवलूजमधून पूजा दिलीप पाटील यांची उमेदवारी देऊन मुश्रीफ यांनी आपला इरादा स्पष्ट केला आणि पहिल्यांदाच उमेदवार उभे करून सहापैकी ३ जागा जिंकून जनसुराज्यच्या गडाला हादरा दिला.

करवीरमध्ये राहुल पाटील यांना बळ

करवीरमध्ये राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात मुश्रीफ यांनी अर्ज माघारीच्या आधी राहुल यांना जोडण्या घालण्यासाठी सहकार्य केले आणि शेवटपर्यंत बळही दिले. परिणामी, करवीरमधून तीन जागा येण्यास मदत झाली.

राष्ट्रवादीच्या तालुकावार जागा

गडहिंग्लज ०४, करवीर ०३, कागल ०३, चंदगड ०३, पन्हाळा ०३, आजरा ०२, राधानगरी ०१, शाहूवाडी ०१

Web Title : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में एनसीपी का लाभ; कोरे को मिली फटकार

Web Summary : हसन मुश्रीफ ने विनय कोरे की चुनौती का जवाब पन्हाला और शाहूवाड़ी में एनसीपी की जीत के साथ दिया। मुश्रीफ ने रणनीतिक रूप से जिला परिषद और पंचायत समिति चुनावों पर ध्यान केंद्रित किया, जिससे चंदगढ़ और गडहिंग्लज सहित कई तालुकाओं में एनसीपी को महत्वपूर्ण लाभ हुआ।

Web Title : NCP Gains in Kolhapur ZP Polls; Miffed Kore Gets a Rebuff

Web Summary : Hasan Mushrif retaliated against Vinay Kore's challenge by securing NCP victories in Panhala and Shahuwadi. Mushrif strategically focused on Zilla Parishad and Panchayat Samiti elections, leading to significant gains for the NCP in multiple talukas, including Chandgad and Gadhinglaj.