आयटी इंडस्ट्रीजसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण : ओंकार देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:31 PM2018-09-05T16:31:57+5:302018-09-05T16:42:54+5:30

जागतिक पातळीवरील आयटी इंडस्ट्रीजमध्ये कोल्हापूरची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

Native environment Kolhapur for IT Industries: Onkar Deshpande | आयटी इंडस्ट्रीजसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण : ओंकार देशपांडे

आयटी इंडस्ट्रीजसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण : ओंकार देशपांडे

googlenewsNext
ठळक मुद्देआयटी इंडस्ट्रीजसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण : ओंकार देशपांडे‘आयटी असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

कोल्हापूर : उद्यमशीलता, नवनिर्मितीची कौशल्ये असलेले मनुष्यबळ, नैसर्गिक अनुकूलता आणि बंगलोर, गोवा, हैदराबाद यांच्याशी असलेल्या दळणवळणाच्या संलग्नतेमुळे देशातील आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. आयटी पार्क, नियमित विमानसेवा, आदी पायाभूत सुविधांची पूर्तता लवकर झाल्यास जागतिक पातळीवरील आयटी इंडस्ट्रीजमध्ये कोल्हापूरची ओळख निर्माण होईल, असा विश्वास आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

लोकमत’च्या शहर कार्यालयास असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार देशपांडे, सचिव प्रसन्न कुलकर्णी, समिती सदस्य प्रकाश पुणेकर यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अध्यक्ष देशपांडे म्हणाले, आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूर गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे.

असोसिएशनचे ५७ सदस्य आहेत. कोल्हापूरमध्ये अँड्राईड, डॉटनेट अशा सर्व तंत्रज्ञानावर काम चालते. येथील आयटी इंडस्ट्रीजवर सुमारे ७०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असून, वार्षिक उलाढाल सुमारे ६० कोटींपर्यंत आहे. या ठिकाणी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आहे.

नैसर्गिक वातावरण चांगले आहे. या सर्व बाबींचा विचार करता पुणे, हिंजवडीनंतर आता कोल्हापूर हे आयटी इंडस्ट्रीजचा विकास आणि वाढीसाठी पोषक शहर आहे. ते लक्षात घेऊन येथे पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची आणि जागतिक पातळीवरील काही आयटी कंपन्या कोल्हापूरमध्ये येण्याबाबत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

महानगरपालिकेकडून जागा हस्तांतरित व्हावी

स्थानिक आयटी इंडस्ट्रीजच्या वाढीसाठी असोसिएशनने कोल्हापूर आयटी पार्कच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. त्यावर गेल्या चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेने टेंबलाईवाडी परिसरात सव्वातीन एकर जागा आयटी पार्कसाठी आरक्षित केली आहे. ही जागा पुढील कार्यवाहीसाठी असोसिएशनकडे लवकर हस्तांतरित होणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष देशपांडे यांनी सांगितले.

‘लोकमत’ने पाठबळ द्यावे

कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला आहे. चांगल्या उपक्रमांना बळ दिले आहे. कोल्हापुरातील आयटी इंडस्ट्रीजच्या विकासासाठी असोसिएशनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना ‘लोकमत’ने पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा अध्यक्ष देशपांडे यांनी व्यक्त केली. त्यावर संपादक वसंत भोसले म्हणाले, कोल्हापूरमध्ये आयटी इंडस्ट्रीजच्या विकासाची मोठी संधी आहे. त्यासाठी असोसिएशनची भूमिका सरकारदरबारी आणि समाजापर्यंत ‘लोकमत’ निश्चितपणे पोहोचवेल.

 

 

Web Title: Native environment Kolhapur for IT Industries: Onkar Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.