Kolhapur: तुटलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू, पन्हाळा तालुक्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:22 IST2023-06-29T16:21:23+5:302023-06-29T16:22:53+5:30
मुलाला बघायला आई शेताकडे गेली अन्...

Kolhapur: तुटलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू, पन्हाळा तालुक्यातील दुर्दैवी घटना
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : शेतात तुटलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अजय गुंगा मगदून (वय ३०), नंदा गुंगा मगदूम (४९, दोघेही, रा.मंगळवार पेठ ता.पन्हाळा) अशी मृतांची नावे आहेत. आषाढी एकादशीदिवशीच ही दुर्घटना घटल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात झाली.
घटनास्थळ, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नेबापूर येथील जमदाडकी नावाच्या शेतात भात लागणीसाठी टाकलेल्या रोपाला अजय खत टाकण्यासाठी गेले होते. खत टाकत असताना शेतात तुटून पडलेल्या वीजेच्या तारेला अजयच्या पायाला स्पर्श झाला. यावेळी विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अजय बराच वेळ घरी न आल्याने व फोन बंद असल्याने आई नंदा शेताकडे गेल्या. यावेळी अजय शेताच्या बांधावर पडलेला दिसला. त्याच्या अंगावर पडलेली वीजेची तार बघून आईने आरडाओरडा केला. अन् मुलाच्या अंगावरील विद्युत तार बाजूला करताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून गावातील लोक येईपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.