पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 02:10 PM2019-08-17T14:10:25+5:302019-08-17T14:21:13+5:30

महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील सोलापूरचे..!

Muslim brothers rush to wipe away the tears of flood victims | पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !

पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !

googlenewsNext
ठळक मुद्देपूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !सीमाभागातील पूरग्रस्तांना पुरवताहेत तयार गरम जेवण

गडहिंग्लज : महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील सोलापूरचे..!

सीमाभागातील गडहिंग्लज आणि हुक्केरी तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना हिरण्यकेशी नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला. निम्मीच्या निम्मी गाव पाण्यात बुडाली. शेकडो घर जमीनदोस्त झाली. गुरा-ढोरासह घर सोडायची वेळ अनेकांवर आली. त्यामुळे शेजारधर्म म्हणून आजूबाजूच्या गावची माणसं मदतीला धावून येताहेत.
कोण धान्य घेवून येतो तर कोण जनावरांना वैरण आणतो आहे. परंतु, सोलापूरचे मुस्लिम बांधव भाजी-भाकरीच तयार जेवण आणून स्वत: वाढतात.

सोलापूर येथे मुस्लिम समाजाची ३५० कुटुंबे आहेत. सर्व मंडळी अडी-अडचणीच्यावेळी एकमेकांच्या मदतीला न बोलावता धावून जातात. पैशाअभावी कुणा गरीबाच शुभकार्य थांबणार नाही, याची काळजी घेतात. समाजातील गरीब माणसाच्या अंत्यविधीचा खर्चही वर्गणी काढून करतात. म्हणूनच त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूरग्रस्तांना जेवण देण्याचे काम हाती घेतले आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी, हेब्बाळ, नूल, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर, कोचरी, कुरणी, बस्तवाड या गावातील पूरग्रस्तांना त्यांनी जेवण दिले. कांही गावात खीर आणि शिरकुर्माही वाटला. जेवणाची भांडी ने-आण करण्यासाठी दीपक लोहार व अब्दुल मकानदार हे आपली वाहने मोफत देत आहेत. हसनभाई मुल्ला व नसरूद्दीन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर जमादार, मलिक मुल्ला, बशीर सुतार, मुझफ्फर मुल्ला, वासीम मदारखान, शब्बीर मदारखान यांच्यासह सर्व समाजबांधव हे काम उत्स्फूर्तपणे करीत आहेत.

हसनभाई देतात दूध

प्रगतशील शेतकरी हसनभाई मुल्ला यांनी गोठा पद्धतीने ५० गायी पाळल्या आहेत. त्यांनी आपले संपूर्ण दूध पूरग्रस्तांसाठी देवू केले आहे. त्यातून खीर व शिरकुर्मा करून पूरग्रस्तांना वाटला जात आहे.

 घरा-घरातून भाकऱ्या

घरा-घरातून प्रत्येकी १० भाकऱ्या गोळा केल्या जातात. भाजी, भात व आमटी एकाच ठिकाणी बनविली जाते. आचारी सिकंदर जमादार हे काम विनामोबदला करीत आहेत.

प्रसिद्धीपासून दूर..!

आमच नाव, फोटो कांही नको. पण, कुठल्या गावाला जेवण लागल तर जरूर सांगा, आम्ही हजर आहोत, असं ते अत्यंत विनयाने सांगतात. त्यांच्या माणुसकीच्या जागराने दान-धर्मातही आपली छबी ठेवणाऱ्यांना चपराक मिळाली आहे.

Web Title: Muslim brothers rush to wipe away the tears of flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.