दिवाळी एक्स्प्रेसला चुकीच्या वेळेचा फटका, विनागर्दीच्या धावल्या दोन गाड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 19:27 IST2025-10-24T19:27:02+5:302025-10-24T19:27:55+5:30
जाहीर केलेली कटिहार रेल्वे न सोडल्याने बिहारीबाबूंना भुर्दंड

संग्रहित छाया
संदीप आडनाईक
कोल्हापूर : दिवाळीची प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने नोव्हेंबरमध्ये मुंबई, कलबुर्गीसह बिहारसाठी कोल्हापुरातून विशेष एक्स्प्रेस रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली होती. परंतु मुंबई आणि कलबुर्गी या दोन्ही विशेष रेल्वेला चुकीच्या वेळेचा फटका बसला. या दोन्ही गाड्या कमी प्रवाशांना घेऊन धावल्या. याशिवाय जाहीर केलेली कटिहार गाडी यंदा न सोडल्याने बिहारी प्रवाशांना भुर्दंड बसला आहे.
कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून २४ सप्टेंबरपासून (गाडी क्र. ०१४१७) कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स-कोल्हापूर ही विशेष एक्स्प्रेस प्रत्येक बुधवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होते. हीच गाडी (क्रमांक ०१४१८) दुसऱ्या दिवशी १.३० वाजता मुंबईत पोहोचते. त्यामुळे या अवेळी पोहोचणाऱ्या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद नाही. २० डब्यांची रचना असलेल्या या गाडीच्या २६ नोव्हेंबरपर्यंत १० फेऱ्या होणार आहेत. या गाडीलाही फारशी गर्दी नाही.
याशिवाय कोल्हापूर-कलबुर्गी (गाडी क्र.०१२०९/१०) एक्स्प्रेस ही स्पेशल गाडीही कमी प्रवाशांसह धावते आहे. शुक्रवारवगळता २४ सप्टेंबरपासून रोज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटते. या गाडीच्या ५८ फेऱ्या आहेत. या गाडीसाठी १८ डब्यांची रचना आहे. परंतु चुकीच्या वेळापत्रकामुळे या गाडीलाही फटका बसला आहे.
पुणे विशेष रेल्वेला ४० टक्के आरक्षण
कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस हीच गाडी (क्र. ०१०२४) विशेष रेल्वे म्हणून पुण्यापर्यंत सोडली जाते. रात्री ११.३० वाजता सुटणाऱ्या या गाडीचेही फक्त ४० टक्के आरक्षण झाले आहे. त्यामुळे या विशेष रेल्वेलाही प्रवाशांचा प्रतिसाद नाही.
बिहारीबाबूंना भुर्दंड
कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून (गाडी क्र. ०१४०५) कटिहार-सांगली-कोल्हापूर एक्स्प्रेस विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर रविवारी सकाळी ९.३५ वाजता बिहारमधील कटिहारसाठी जाहीर केली होती. १८ डब्यांच्या या रेल्वेच्या १४ फेऱ्या निश्चित होत्या. परंतु ही गाडी दिवाळीपर्यंत तरी सोडलीच नाही. यामुळे बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड बसला आहे.