गांजाचा धूर.. 'उडता कोल्हापूर'; साताऱ्यातील गांजाचे मुंबई कनेक्शन
By उद्धव गोडसे | Updated: January 24, 2025 18:16 IST2025-01-24T18:15:45+5:302025-01-24T18:16:07+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरात पकडलेल्या गांजा तस्करांचे मुंबई कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले. मुंबईतील एका व्यक्तीकडून सुमारे १०० किलो गांजा आणल्याचे ...

गांजाचा धूर.. 'उडता कोल्हापूर'; साताऱ्यातील गांजाचे मुंबई कनेक्शन
कोल्हापूर : कोल्हापुरात पकडलेल्या गांजा तस्करांचे मुंबई कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले. मुंबईतील एका व्यक्तीकडून सुमारे १०० किलो गांजा आणल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार मुंबईतील पुरवठारादाच्या शोधासाठी लवकरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना होणार आहे. अटकेतील तिघांना गुरुवारी (दि. २३) न्यायालयात हजर केले. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, पोत्याने गांजा सापडत असल्याने जिल्ह्यातील त्याचा वाढता वापर स्पष्ट झाला आहे.
गोव्यातील सॅम नावाच्या व्यक्तीला १० किलो गांजा विकण्यासाठी निघालेला फैय्याज अली मोकाशी (वय ३७, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड, जि. सातारा) हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागला. त्याच्या चौकशीतून गांजा तस्करांच्या टोळीचा छडा लागला. मोकाशी याच्यासह सोहेल सलीम मोमीन (३३, रा. उंब्रज, जि. सातारा) आणि समीर ऊर्फ तौसिफ रमजान शेख (२१, रा. रहिमतपूर कोरेगाव, जि. सातारा) या तिघांकडून ९१ किलो गांजा जप्त केल्यानंतर पोलिसांनी तस्करांची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.
रहिमतपूर येथील समीर शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुंबईतून गांजा आणल्याची माहिती मिळाली. त्याने मुंबईतील एका व्यक्तीने चार महिन्यांपूर्वी गांजा आणला होता. त्याची विक्री झाल्यानंतर पुन्हा १०० किलो गांजा आणला. त्यातील १० किलो गांजा गोव्याला पाठवला जात होता.
प्रथमच मोठा माल मिळाला
कोल्हापुरात प्रथमच तब्बल ९१ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. यापूर्वी एकाचवेळी ४० किलोपर्यंत गांजा पोलिसांनी पकडला होता. मोठ्या कारवाईमुळे गांजा तस्करीला आळा बसेल, अशा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तरुणाईला गांजाची झिंग
दारू, कोकेन, चरस, एमडी ड्रग्जच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. तो सहज उपलब्ध होतो. खिशात पुडी घेऊनही फिरता येते. दीर्घकाळ नशा टिकून राहते. यामुळे गांजाचा वापर वाढल्याचे दिसत आहे. महाविद्यालयीन तरुण आणि मजुरांकडून याचा वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. काही तरुणीदेखील गांजाच्या आहारी गेल्याचे दिसत आहे.
उद्यानांमध्ये नशेबाजांची टोळकी
शहरातील बहुतांश उद्याने, मैदाने, पंचगंगा नदी घाट, शेंडा पार्क, गिरगाव रोड, कंदलगाव रोड, चित्रनगरी परिसरातील झुडपांच्या आडोशाला नशेबाजांचे अड्डे आहेत. नशेबाजांमुळे नागरिकांना उद्यानांमध्ये फिरणे मुश्कील बनले आहे. कोणी हटकले तर ते थेट अंगावर धावून जातात.
गुन्हेगारीत वाढ
गेल्या वर्षभरातील झालेल्या गंभीर गुन्ह्यांमधील बहुतांश आरोपी गांजाच्या नशेत होते. हुतात्मा पार्क येथे गांजा ओढणाऱ्यांना हटकल्यानेच टोळक्याने एका व्यक्तीचे शिर कापून ओढ्यात टाकले. रंकाळा चौपाटीवर रावण टोळीच्या म्होरक्याचा खून करणारे तरुणही गांजाच्या नशेत होते. गांजामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे.
आता क्विंटलमध्ये
यापूर्वी गांजा ग्रॅममध्ये सापडत होता. तो आता क्विंटलमध्ये सापडू लागला आहे. याचा अर्थच त्याची लागण राजरोसपणे सुरू आहे. त्याचा वापरही वाढल्याने मागणी वाढली त्यामुळेच त्याचा पुरवठा ग्रॅमवरून क्विंटलवर गेला आहे.
मुंबई ते गोवा व्हाया कोल्हापूर अशी होणारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी मुंबईतील पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक करून तस्करांची साखळी उद्ध्वस्त करू. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा