प्रकाश आवाडेंना येणाऱ्या काळात उत्तर देवू, धैर्यशील माने यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:02 IST2024-02-15T18:02:09+5:302024-02-15T18:02:36+5:30

लोक त्यांना बदला म्हणून सांगतात, आवाडे यांचा व्हिडीओ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार व्हायरल

MP Darhysheel Mane reacted to the statement made by MLA Prakash Awade | प्रकाश आवाडेंना येणाऱ्या काळात उत्तर देवू, धैर्यशील माने यांचे प्रत्युत्तर

प्रकाश आवाडेंना येणाऱ्या काळात उत्तर देवू, धैर्यशील माने यांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांनी माझ्याबाबत जे विधान केले आहे. त्याचे उत्तर येणाऱ्या काळात देऊ, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील खासदार आणि आमदार यांच्यातील आरोप प्रत्यारोप जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. आवाडे मुलगा राहुल याला लोकसभेची उमेदवारी पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत.

आमदार आवाडे यांनी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथील रस्त्याच्या उद्घाटन समारंभात चार दिवसांपूर्वी या खासदारांनी मतदारसंघासाठी काय केले, असा सवाल उपस्थित केला होता. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे त्रिकालबाधीत सत्य आहे. त्याबद्दल वाद राहिला नाही. फक्त खासदार कामातला पाहिजे एवढेच सगळ्यांचे मत आहे. पण इथला कोण, तो काय देणार या भागाला, याची उत्तरे सगळ्यांना द्यावी लागणार आहेत. चांगले असल्याशिवाय लोक चालवून घेणार नाहीत. जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मनस्थितीत नाहीत.

विकसित भारत घेऊन गावागावांत फिरायला लागलाय परंतु लोक त्यांना बदला म्हणून सांगतात की नाही, अशी थेट विचारणाच आवाडे यांनी केली आहे. हा व्हिडीओ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार व्हायरल झाला. त्याची चर्चाही राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली. या पार्श्वभूमीवर माने यांनी एकाच वाक्यात प्रत्युतर दिले. सध्या आमच्या अधिवेशनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना उत्तर दिले जाईल, असे खासदार माने यांनी सांगितले.

Web Title: MP Darhysheel Mane reacted to the statement made by MLA Prakash Awade