माल ट्रक वाहतूकदारांचे आंदोलन दोन महिन्यांसाठी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:37 PM2019-08-26T13:37:30+5:302019-08-26T13:41:23+5:30

कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी ...

Movement of goods truck transporters postponed for two months | माल ट्रक वाहतूकदारांचे आंदोलन दोन महिन्यांसाठी स्थगित

 कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रक वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदीप कापडिया, पी. जी. मेढे, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सुभाष जाधव, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्दे तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : ट्रक वाहतूकदार-व्यापाऱ्यांची बैठक दोन दिवसांपासून थांबलेले ट्रक पुन्हा धावणार

कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आले.

दोन भरणीचे पैसे व्यापाऱ्यांनी व एका भरणीचे पैसे ट्रक वाहतूकदारांनी द्यावे, असा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर भरणीची रक्कम ही व्यापाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या भाड्यातच समाविष्ट करण्याबाबत पुढील १५ दिवसांनी बैठक घेऊन आढावा घेण्याचे ठरले. यानंतर ट्रक वाहतूकदारांनी गाड्या माल भरून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला.

साखर व्यापाऱ्यांनी भरणी द्यावी. या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ट्रक वाहतूकदार संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक बंद आंदोलन सुरू केले होते. या विषयावर रविवारी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लॉरी संघटना, व्यापारी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दौलत देसाई होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, राजाराम साखर कारखान्याचे मानद तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेंढे, असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, आदी उपस्थित होते.

यावेळी ट्रक वाहतूकदारांतर्फे सुभाष जाधव, व्यापाऱ्यांतर्फे श्रीमल जैन, हमालांतर्फे सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी बाजू मांडली. जिल्हाधिकारी देसाई यांनी साखर आयुक्त, कारखाना प्रतिनिधी, ट्रक वाहतूकदार, हमाल संघटना यांची बैठक घेऊन मार्ग काढू, त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्या.

भरणीला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी आवश्यक आहे; त्यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी आढावा घेण्याची ग्वाही दिली. यावर सुभाष जाधव दोन भरण्या व्यापाऱ्यांनी द्याव्यात, एक भरणी आम्ही सोसू, अशी भूमिका मांडली. अखेर साखर आयुक्त, कामगार, माथाडी मंडळाशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यावर एकमत झाले. त्याला व्यापारी संघटनांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दोन महिन्यांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, दिनकर पाटील, नयन प्रसादे, रमेश कणेरकर, पंडित कोरगावकर, रोहन बेंडके, डी. एच. गायकवाड, यशवंत हुंबे, अमित खटावकर, आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनीही शनिवारी दिले निवेदन

भरणीबाबत ट्रक वाहतूकदारांनी ३० जुलै आणि २ आॅगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन २२ सप्टेंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. ट्रक वाहतूकदार संघटनांनी आंदोलन सुरू करताच शनिवारी (दि. २४) व्यापारी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

 

 

Web Title: Movement of goods truck transporters postponed for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.