सामान्य रेल्वे प्रवाशांचे सव्वादोनशे बर्थ कमी करण्याच्या हालचाली, प्रवासी संघटनेचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:43 IST2025-09-10T12:43:26+5:302025-09-10T12:43:48+5:30
वातानुकूलित थ्री टायरसाठी महालक्ष्मी, हरिप्रिया एक्स्प्रेसचे तीन डबे कमी करणार

सामान्य रेल्वे प्रवाशांचे सव्वादोनशे बर्थ कमी करण्याच्या हालचाली, प्रवासी संघटनेचा विरोध
कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस तसेच तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला वातानुकूलित थ्री टायर डबा जोडण्यासाठी शयनयानचे तीन डबे कमी करण्याच्या मध्य रेल्वेच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे सामान्य प्रवाशांचे सव्वादोनशे बर्थ कमी होणार आहेत. याला रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध केला आहे.
तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस २१ एलएचबी कोचसह धावते आहे. ही गाडी रोज रात्री ८:५० वाजता कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटते. या रेल्वेसेवेला प्रवाशांची मोठी मागणी आहे. या रेल्वेला अलीकडेच जादा एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी या नवीन वाढीव कोचमधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच रेल्वे प्रशासनाने हा नवा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
कोल्हापुरातून मुंबईला जाणारी ही एकमेव रेल्वे आहे. या गाडीला १२ महिने प्रतीक्षा असल्यामुळे प्रवासी संघटनांनी आणखी दोन आरक्षित स्लीपर डबे वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री मुंबईपर्यंत सुरू करण्याची मागणीही केली आहे, तसे पत्रही कोल्हापूर रेल्वे स्थानक प्रमुखांकडे दिले आहे. यापूर्वीही दोन स्लीपर कमी करून एक जनरल डबा जोडण्याच्या हालचालीला प्रवासी संघटनांनी लगाम लावला होता.
या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असूनही ऐन हंगामात डबे वाढवण्याची मागणी केली असता ते कमी करण्याचा प्रकार संतापजनक आहे. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी रोज पाचशे ते सहाशे प्रवासी प्रतीक्षेत असतात. - सुहास गुरव, सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
मध्य रेल्वेला उत्पन्न देणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढविण्याची मागणी असताना आता तीन आरक्षित डबे कमी करण्यात येणार आहे, हे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न केल्यास नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल.-उदयसिंह निंबाळकर, सदस्य, कोल्हापूर-सांगली रेल्वे पॅसेंजर असोसिएशन