बाळाला दूध पाजतानाच आईनं सोडले प्राण, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:30 IST2025-07-24T14:29:54+5:302025-07-24T14:30:19+5:30

अचानक घडलेल्या घटनेने चौगले कुटुंबीयांना धक्का बसला

Mother dies while breastfeeding baby in Kolhapur | बाळाला दूध पाजतानाच आईनं सोडले प्राण, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

बाळाला दूध पाजतानाच आईनं सोडले प्राण, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

कोल्हापूर : वीस दिवसांची चिमुकली पीयुषाला दूध पाजतानाच आई रचना स्वप्नील चौगले (वय २७, रा. संभाजीनगर स्टँडजवळ, कोल्हापूर) बेशुद्ध झाल्या. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. बुधवारी (दि. २३) पहाटे ही घटना घडली. रचना यांच्या दोन मुली आईच्या मायेला पोरक्या झाल्या. अचानक घडलेल्या घटनेने चौगले कुटुंबीयांना धक्का बसला.

सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर स्टँडजवळ राहणाऱ्या रचना आणि स्वप्नील यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना सहा वर्षांची मोठी मुलगी आहे. २० दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मुलगी झाली. प्रसुती झाल्यानंतर चौगले कुटुंबीयांनी छोट्या मुलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आठवड्यापूर्वीच तिचे बारसे झाले. आनंदाने तिचे नाव पीयुषा असे ठेवले. माय-लेकी दोघींची तब्येत ठणठणीत होती. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत होत्या. काही वेळाने मुलगी रडू लागली. त्यानंतर पती स्वप्नील यांनी उठून पत्नीला हलवले, तर त्या बेशुद्ध असल्याचे लक्षात आले.

तातडीने त्यांनी इतर नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथून सीपीआरमध्ये हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप आला नसून, हृदयविकाराने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

आशा वर्करचे काम

रचना चौगले या आशा वर्कर म्हणून काम करीत होत्या. त्यामुळे प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीनंतर काय खबरदारी घ्यावी, याची चांगली कल्पना त्यांना होती. यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काहीच तक्रार नव्हती. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वच नातेवाइकांना धक्का बसला. त्यांचे पती स्वप्नील हे गोकुळ शिरगाव एमआयडीसीत एका कंपनीत काम करतात. चिमुकल्या दोन मुलींची जबाबदारी आता वडिलांसह आजी आणि आजोबांवर आली आहे.

Web Title: Mother dies while breastfeeding baby in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.