सम्मेद शेटे ठरला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:39 IST2019-04-02T17:38:43+5:302019-04-02T17:39:07+5:30
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) च्या सोमवारी (दि.१) प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीनूसार कोल्हापूरचा बुद्धिबळपटू सम्मेद शेटे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवणारा बुद्धिबळपटू ठरला.

सम्मेद शेटे ठरला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू
कोल्हापूर : जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) च्या सोमवारी (दि.१) प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीनूसार कोल्हापूरचा बुद्धिबळपटू सम्मेद शेटे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवणारा बुद्धिबळपटू ठरला.
सम्मेद याने २४३१ इतके आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवले. यापूर्वी सांगलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कठमाळे हा २४०० गुण मिळवून दक्षिण महाराष्ट्रातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळविणारा बुद्धिबळपटू होता. त्याला मागे टाकत सम्मेदने बाजी मारली. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे)प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व बुद्धिबळपटूंची मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत खेळून केलेल्या कामगिरीनुसार नवीन आंतरराष्ट्रीय गुणांकन यादी जाहीर केली जाते. त्यानूसार कोल्हापूर जिल्ह्यातील आघाडीचे तीन बुद्धिबळपटूंचा यात समावेश होता. त्यात सम्मेद शेटे २४३१ याने प्रथम, तर आंतरराष्ट्रीय महिला मास्टर ऋचा पुजारी हिने २२०५ गुण मिळवून द्वितीय, तर अनिष गांधी याने २२०२ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ पन्नासहून अधिक बुद्धिबळपटूचा समावेश आहे.
जगज्जेता नॉवेर्चा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन या यादीमध्ये २८४५ आंतरराष्ट्रीय गुणांकनासह जगामध्ये सर्वात आघाडीवर तर माजी जगज्जेता भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद २७७४ आंतरराष्ट्रीय गुणांकनासह जगात सहाव्या स्थानावर आहे. सम्मेद शेटे विवेकानंद महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेत शिकत असून त्याला प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व सचिव भरत चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील,कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.वाय. होनगेकर,क्रीडा मार्गदर्शक किरण पाटील, संतोष कुंडले यांचे प्रोत्साहन लाभले.